Vinesh Phogat :- भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat Disqualified) हिच्यासाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा शेवट अतिशय दु:खद राहिला. उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यातील दमदार प्रदर्शनाच्या जोरावर विनेश महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. परंतु मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अंतिम फेरी खेळता आली नाही आणि पदकाविनाच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी विनेशचे सांत्वन केले, तिला धीर दिला. मात्र यादरम्यान काहींनी तिच्यावर टीकाही केली.
अशातच एका भाजप नेत्याच्या कमेंटवरून सोशल मीडियावर नवीन वाद सुरू झाला. या कमेंटचा केवळ जाट समाजाने विरोधच केला नाही तर त्याविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केली आहे.
त्याचे झाले असे की, सोशल मीडिया अकाउंटवर विशाल वार्षणेय नावाच्या व्यक्तीने विनेशबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली. विनेश अपात्र ठरल्यानंतर त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘लैंगिक शोषणाचा आरोप तर केलाच होता. दोन-चार कपडे काढून टाकले असते तर 200 ग्रॅम वजन कमी भरलं असतं.’ याच पोस्टवरून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर या व्यक्तीने त्याच्या नावापुढे भाजप असं लिहिलं आहे. त्यामुळे ही व्यक्ती भाजपचा नेता किंवा कार्यकर्ता असल्याचं मानलं जातंय.
आक थू..! pic.twitter.com/I0pe2vBScF
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) August 10, 2024
जाट समाजाने या पोस्टचा विरोध केला असून त्यांनी त्याविरोधात पोलिसांत एफआयआरसुद्धा दाखल केली आहे. तसेच प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही संबंधित भाजप नेत्याला सुनावलं आहे.
दरम्यान सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या विनेशच्या अपात्रतेचा मुद्दा बराच चर्चेत असून या प्रकरणी भारताने क्रीडा लवादाकडे (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) अपील केले आहे. कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू असून 13 ऑगस्टपर्यंत निकाल लागू शकतो.