आयपीएल २०२० च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आपले पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले. या पाचही विजेतेपदावेळी रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार होता. मुंबईच्या या कामगिरीनंतर रोहित शर्माला भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनवण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. अनेक दिग्गजांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रा याने या गोष्टीला विरोध केलेला. त्याने रोहित शर्माच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली होती. आता, रोहित शर्माने स्वतः आकाश चोप्राचे नाव न घेता त्याला उत्तर दिले आहे.
आकाश चोप्राने रोहितच्या नेतृत्वावर शंका केली होती उपस्थित
मुंबई इंडियन्सने १० नोव्हेंबर रोजी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात, सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली होती. त्यानंतर रोहित शर्माला भारतीय टी२० संघाचा कर्णधार करण्यात यावे, असे अनेकांनी म्हटले होते. मात्र, आकाश चोप्राने विराटची पाठराखण केली होती.
आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवरून म्हटले होते की, “एक संघ म्हणून मुंबई इंडियन्स अत्यंत जबरदस्त आहे. रोहित शर्मा बेंगलोरचा कर्णधार असता, तर तो बेंगलोरला पाच विजेतेपद मिळवून देऊ शकला असता का ?”
रोहितने नाव न घेता दिले आकाश चोप्राला प्रत्युत्तर
आकाश चोप्राच्या या प्रश्नाला खुद्द रोहित शर्माने उत्तर दिल्याचे दिसून येते. रोहितने मुंबईच्या यशाबद्दल, पीटीआयशी बोलताना म्हटले, “हे खरे आहे की आमच्याकडे एक उत्कृष्ट संघ आहे. पोलार्ड, पंड्या, बुमराह यांच्यासारखे नामांकित खेळाडू आमच्या संघात आहेत. मागे कोणीतरी बोलले की, रोहित इतर संघासोबत अशी पाच जेतेपदे जिंकू शकला असता का? मात्र, पहिली गोष्ट अशी की मी इतर संघाकडून का खेळावे ?
मुंबई फ्रॅंचायझीकडे आहे एक निश्चित ध्येय
रोहित पुढे स्पष्टीकरण देत म्हटले, “मुंबई फ्रॅंचायझी एक निश्चित ध्येय ठेवून मार्गक्रमण करत आहे. एक खेळाडू आणि कर्णधार या नात्याने मीदेखील त्याच वाटेवर आहे. संघाने हे यश एका रात्रीत मिळवले नाही. आम्ही खेळाडूंना संघाच्या आत-बाहेर करण्यात विश्वास ठेवत नाही. २०११ आयपीएलवेळी माझ्यासह सर्व खेळाडूंचा लिलावात समावेश होता. त्यावेळी फक्त मुंबई इंडियन्सने आमच्यावर विश्वास दाखवला.”
आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे रोहित
रोहित शर्मा २०११ आयपीएल पासून मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे. आयपीएल २०१३ च्या मध्यात रिकी पॉंटिंगकडून रोहितने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर रोहितने आठ हंगामांपैकी पाच हंगामात मुंबईला विजयी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी निराशेतून लवकर बाहेर येईल आणि…”, भारतीय संघात निवड न झाल्यामुळे सूर्यकुमारने रोहितशी केली चर्चा
…म्हणून मुंबईच्या प्रशिक्षकाला नकोय ‘मेगा ऑक्शन’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात