चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) पार पडलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरला आहे. त्याने या विजयासह एक विक्रम केला आहे.
अझरुद्दीनची बरोबरीही आणि खास योगायोगही –
विराट कोहलीने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशात म्हणजेच भारतात भारतीय संघाचे ७८ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील ५३ सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत. त्यामुळे मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराटने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची बरोबरी केली आहे. अझरुद्दीननेही भारतात ५३ सामन्यांत विजय मिळवले आहेत.
विशेष योगायोग म्हणजे अझरुद्दीननेही ७८ आंतरराष्ट्रीय सामन्यांत मायदेशात भारताचे नेतृत्व करताना ५३ विजय मिळवले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशात सर्वाधिक विजय मिळणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट आणि अझरुद्दीन यांच्या पुढे अव्वल क्रमांकावर एमएस धोनी आहे. त्याने मायदेशातील १२३ सामन्यांत ७४ सामने जिंकले आहेत.
विराटचे ५३ विजय –
विराटने मायदेशात कर्णधार म्हणून मिळवलेल्या ५३ विजयांमध्ये २१ कसोटी विजयांचा समावेश आहे. तसेच २२ वनडे सामन्यांतील विजयांचा आणि १० टी२० सामन्यांतील विजयांचा समावेश आहे.
धोनीच्या विक्रमाशी बरोबरी –
विराटने मायदेशात २१ व्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून विजय मिळवण्याबरोबरच धोनीच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. धोनीनेही मायदेशात कर्णधार म्हणून २१ कसोटी सामने जिंकले आहेत.
चेन्नई कसोटीत भारताचा विजय –
या सामन्यात भारताने इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला १६४ धावाच दुसऱ्या डावात करता आल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईन अलीने सर्वाधिक १८ चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले. तसेच जो रुटने ३३ धावांची खेळी केली. भारताकडून या डावात अक्षर पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी भारताने या सामन्यात पहिल्या डावात रोहित शर्माच्या दीडशतकी (१६१) तसेच अजिंक्य रहाणे (६७) आणि रिषभ पंतच्या (५८*) अर्धशतकाच्या जोरावर ३२९ धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडला पहिल्या डावात १३४ धावांवर रोखले होते. त्यामुळे भारताने पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी मिळवली होती. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताकडून आर अश्विनने ५ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर भारताचा दुसरा डाव ८५.५ षटकात २८६ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतानं पहिल्या डावातील १९५ धावांची आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी ४८२ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले. भारताकडून दुसऱ्या डावात आर अश्विनने १०६ धावांची शतकी खेळी केली. तसेच विराट कोहलीने ६२ धावांची खेळी केली. या डावात इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीचने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीने केली ‘कॅप्टनकूल’ धोनीची बरोबरी, आता स्मिथचा विक्रम निशाण्यावर
“पंत पुढची १० वर्षे क्रिकेटचं मैदान गाजवेल,” भारतीय दिग्गजाकडून कौतुकाची थाप
‘आम्ही मुळे कधीच काढून फेकली होती आता…’, अमिताभ बच्चन यांनी केले इंग्लंडला ट्रोल






