आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली असून ७ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आरसीबी संघ सोमवार (२० सप्टेंबर) रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहे.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली संघात नवीन सहभागी झालेल्या ४ खेळाडूंविषयी उत्साहित दिसत आहे. यावर्षी श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगा याला आरसीबीने संघात सामील केले आहे. या निवडीवर विराट खूश आहे. नेहमीप्रमाणे तो यावेळीही संघात नव्याने सामील झालेल्या सर्व खेळाडूंशी व्हॉट्सअप चॅटद्वारे बोलत आहे.
वानिंदु सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. श्रीलंकेच्या या फिरकी गोलंदाजाला आरसीबीचा कर्णधार विराटने प्रेरणादायी मेसेज केला आहे. हसरंगाही कर्णधाराच्या मेसेजमुळे उत्साहित आहे आणि लवकरात लवकर आरसीबीसोबत सामील होण्यासाठी उत्सुक आहे.
कर्णधार विराट सध्या दुबईमध्ये विलगीकरणात आहे आणि आरसीबीच्या नवीन सदस्यांबाबत खूप उत्साहित आहे. आपल्या नव्या शिलेदारांना मेसेज करत त्याने लिहिले की, “मी सर्वांच्या संपर्कात आहे. आम्ही मागच्या एक महिन्यात खूप चर्चा केली आहे. संघात दुसऱ्यांची जागा घेणाऱ्या खेळाडूंविषयीही चर्चा झाली आहे. अखेरीस आम्ही आमच्या प्रमुख खेळाडूंच्या बदल्यात प्रतिभाशाली क्रिकेटपटूंना संघात सामिल करू शकलो आहोत.”
“आम्हाला प्रमुख खेळाडूंची कमतरता जाणवेल. पण त्यांच्याजागी जे खेळाडू संघात येत आहेत, त्यांच्याकडे या परिस्थितीसाठी अप्रतिम कौशल्य आहे. मी त्यांना भेटण्यासाठी उत्साहित आहे. सर्वांसोबत सराव करण्याची वाट पाहत आहे. आम्ही चांगल्या सुरुवातीला पुढे कायम ठेऊ इच्छितो,” असेही त्याने लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर प्रेयसीलाही सोडले, आता ऑसी क्रिकेटरने खरेदी केले ७० कोटींचे ‘बॅचलर घर’
तारीख ठरली! आयपीएलच्या २ नव्या संघांचा ‘या’ दिवशी लिलाव, पुणे फ्रँचायझीचे जुने मालकही उतरणार
‘या’ गोलंदाजांनी आयपीएलच्या एका हंगामात लुटवलेत सर्वाधिक षटकार, अनेक दिग्गजांचा समावेश