---Advertisement---

हे ५ निर्णय झाले नसते तर जगाला मिळाले नसते ५ महान खेळाडू

---Advertisement---

सर्वांच्याच आयुष्यात अशी एखादी घटना घडते किंवा असा एखादा निर्णय घेतला जातो, ज्यामुळे आयुष्याला वेगळे वळण मिळते. क्रिकेटमध्येही असे काही निर्णय काही खेळाडूंच्या बाबतीत घेतले गेले, ज्या निर्णयामुळे त्या खेळाडूंचे आयुष्य तर बदललेच पण ते खेळाडू आज दिग्गज खेळाडूंमध्ये गणले जातात. अशाच एका निर्णयामुळे आयुष्य बदललेल्या खेळाडूंबद्दल या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

एका निर्णयामुळे कारकिर्दीला वेगळे वळण मिळालेले ५ खेळाडू –

१. एमएस धोनीने रोहित शर्माला सलामीला फलंदाजीला पाठवण्याचा घेतलेला निर्णय 

२००७ ला जेव्हा रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा तो मधल्या फळीतील फलंदाज होता. पदार्पणानंतर पुढील काही वर्षे तो मधल्या फळीतच खेळला. मात्र त्याची अपेक्षित कामगिरी होत नव्हती. त्यामुळे त्याला सुरुवातीला संघातून वगळण्यातही आले. पण नंतर पुन्हा २०११ नंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले.

२०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान धोनीने रोहितला शिखर धवनबरोबर सलामीला फलंदाजी करण्याबद्दल विचारले. हा निर्णय रोहितच्या कारकिर्दीला वळण देणारा ठरला. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शिखरबरोबर सलामीला यशस्वी भागीदारी करत भारताने मिळवलेल्या विजेतेपदामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला.

रोहितने पुढे भारताकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये नियमितपणे सलामीला फलंदाजी केली. तो आता एक दिग्गज सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने सलामीवीर म्हणून १४० वनडेत ७१४८ धावा केल्या आहेत. तर २७ शतके केली आहेत.

तसेच त्याने टी२०मध्येही ४ शतके सलामीला फलंदाजी करताना केली आहेत. त्याचबरोबर आता रोहितने कसोटीतही सलामीला फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे.

२. गांगुलीने सेहवागला सलामीला पाठवण्याचा घेतलेला निर्णय 

विरेंद्र सेहवाग नेहमीच सलामीला फलंदाजी करताना त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे ओळखला जातो. पण त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात १९९९ ला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती. पण २००१ नंतर सेहवागला गांगुलीने सलामीला फलंदाजी करण्यास सांगितले. कारण संघात असलेल्या मधल्या फळीतील अन्य फलंदाजांमुळे सेहवागला संघात स्थान देणे कठीण जात होते.

गांगुलीने सेहवागला सलामीला पाठवण्याचा घेतलेला हा निर्णय सेहवागसाठी महत्त्वाचा ठरला. सेहवागने नंतर सलामीला फलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६११९ धावा केल्या. यात त्याच्या ३६ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने कसोटीत २ त्रिशतकेही सलामीला खेळतानाच केली.

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांमध्ये ५व्या क्रमांकावर आहे.

३. सनथ जयसुर्याने आक्रमक फलंदाजीचा घेतलेला निर्णय 

श्रीलंकेकडून सनथ जयसुर्याने मोठी कारकिर्द घडवली. आज त्याचे नाव श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या ३ खेळाडूंमध्ये घेतले जाते. सुरुवातीला गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केलेल्या जयसुर्याने नंतर फलंदाजीकडे लक्ष केंद्रित केले. १९८९ ला आंतरराष्ट्रीय पदार्पण झालेल्या जयसुर्याने १९९६ च्या विश्वचषकात आक्रमक खेळण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंकेकडून वरच्या फळीत फलंदाजीला येत आक्रमक खेळण्यामुळे त्याने त्या विश्वचषकात जवळजवळ प्रत्येकवेळी श्रीलंकेला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने आक्रमक खेळण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा श्रीलंकेला त्या विश्वचषकात मोठा फायदा झाला.

त्याच्या या आक्रमक फलंदाजीने श्रीलंकेला पहिला वनडे विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्या विश्वचषकानंतर जयसुर्या आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज म्हणून ओळखला गेला.

४. डेनिस लीलीने सचिन तेंडुलकरला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा दिलेला सल्ला 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपण सर्वच एक दिग्गज फलंदाज म्हणून ओळखतो. पण सचिनला सुरुवातीला वेगवान गोलंदाज बनायचे होते. मात्र १९८७ ला डेनिस लीली यांनी त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. याबद्दल सचिनने लीली यांना ६८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये खूलासा केला आहे.

त्याने त्यात सांगितले की १९८७ मध्ये चन्नईत तो त्यांना भेटला होता. तसेच तिथे तो वेगवान गोलंदाजी शिकण्यासाठी आला होता. त्यावेळी लीली यांनी म्हटले होते की ‘या युवा खेळाडूने फलंदाजी केली पाहिजे आणि गोलंदाजीबद्दल विसरुन जायला हवे.’ त्यानंतर मात्र सचिनने फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आणि नंतरचा इतिहास सर्वांना माहितच आहे.

५. राशिद खान संघात घेण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सीईओ यांनी केली होती विनंती 

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक म्हणून राशिद खानचे नाव घेतले जाते. पण त्याला राष्ट्रीय संघात घेण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ शाफिक स्टॅनिकझाई यांना त्यावेळीचा अफगाणिस्तानचा कर्णधार असगर स्टॅनिकझाईला (आत्ताचा असगर अफगाण) पटवून द्यावे लागले होते.

एका मुलाखतीत शफिक यांनी खूलासा केला होता. त्यांनी सांगितले की असगरला त्यांनी पटवून दिले होते की त्याने २०१५ च्या झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान राशिदला कमीतकमी टी२० संघात संधी द्यावी. शफिक यांनी राशिदला १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना पाहिले होते. २०१५ मध्ये राष्ट्रीय संघात संधी मिळाल्यापासून राशिदने मागे वळून पाहिलेले नाही.

ट्रेंडिंग घडामोडी – 

३ भारतीय क्रिकेटर, ज्यांच्या नाव आहे गिनेस वर्ल्ड रिकॉर्डमध्ये

न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये पाणी पाजणारे ३ भारतीय कर्णधार

विश्वचषक विजेता भारतीय खेळाडू म्हणतो, धोनीपेक्षा गंभीर भारी कर्णधार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---