---Advertisement---

क्रिस वोक्स इज बॅक! रोहित शर्माची ११ धावांवर विकेट घेत वर्षभरानंतर केले दमदार पुनरागमन, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 9:16 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवार (२ सप्टेंबर) पासून सुरू झाला आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यापूर्वी झालेल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये लॉर्ड्सवर भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर लीड्सचा सामना इंग्लंडने आपल्या खिशात टाकला होता. ज्यामुळे दोन्ही संघ सध्या या मालिकेत १-१ ने बरोबरीत आहे. चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या अंतिम ११ मध्ये देखील बदल केले आहेत. यात इंग्लंडने सॅम करन ऐवजी क्रिस वोक्सला संघात स्थान दिले आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सने चौथ्या कसोटी सामन्यातून इंग्लंड संघात दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. १ वर्षाने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या वोक्सने दमदार सुरुवात केली आहे. या मालिकेतील आपल्या पहिल्याच सामन्यात वोक्सने भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माला बाद केले. यासह वोक्सचे या मालिकेत दमदार पुनरागमन झाले आहे.

वाेक्सने त्याचा शेवटचा कसोटी सामना २०२० साली पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. ज्यानंतर तो दुखापतीमुळे अनेक दिवस इंग्लंडच्या कसोटी संघातून बाहेर होता. मात्र, इंग्लंडमध्ये खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सॅम करनऐवजी वाेक्सला संधी देण्यात आली. वोक्सने देखील या संधीचे सोने करत शानदार सुरुवात केली. ११ धावांवर खेळत असलेल्या रोहित शर्माला वोक्सने माघारी धाडले.

वोक्सने डावाच्या ९ व्या षटकातील अखेरचा चेंडू आऊटसाईड ऑफला आखूड टप्प्याचा टाकला होता. हा चेंडू रोहितच्या बॅटची वरच्या बाजूची कड घेऊन यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोकडे गेला. त्यामुळे रोहितला ११ धावांवर आपली विकेट गमवावी लागली.

यादरम्यान चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाने देखील संघात मोठे बदल केले. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी अश्विनला संघात संधी मिळेल, अशी शक्यता सर्वत्र वर्तवली जात होती. मात्र कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापकांनी आश्चर्यकारक निर्णय घेत अश्विनला पुन्हा वगळले. यानंतर अनेक दिग्गजांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.

तसेच भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात २ महत्त्वाचे बदल केले. भारतीय संघाने इशांत शर्मा ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी दिली, तर मोहम्मद शमी ऐवजी उमेश यादव संधी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला होते क्रिकेटचे प्रचंड वेड, पाहा त्याच्या तुफान फटकेबाजीचा व्हिडिओ
‘चौथ्या कसोटी अश्विनला का घेतलं नाहीस?’ विराट म्हणतोय….
‘वेडेपणा’! आर अश्विनला चौथ्या कसोटीत संधी न दिल्याने दिग्गजांकडून भारतीय संघव्यवस्थापनेवर टीकास्त्र

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---