मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ डिसेंबरपासून कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेलसाठी खूप खास असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. अजाज पटेल हा भारतीय वंशाचा गोलंदाज असून त्याचा जन्म मुंबईत झाला होता. पण, तो ८ वर्षांचा असताना त्याच्या पालकांसह न्यूझीलंडला स्थायिक झाला. आता पहिल्यांदाच मुंबईत कसोटी खेळण्याबद्दल तो भावूक झाला आहे.
तो सामन्यापूर्वी ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाला, ‘आम्ही काल जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा याबद्दल मी विचार करत होतो. येथे आल्याने छान वाटले. यापूर्वी मी कुटुंबासह सुट्ट्यांमध्ये इकडे आलो आहे. पण यावेळी कारण थोडे वेगळे आहे. यावेळी मी क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत आलोय.’
तो पुढे स्टेडियमबद्दल बोलताना म्हणाला, ‘मी यापूर्वी अनेक आयपीएल सामन्यांसाठी वानखेडे स्टेडियमवर आलो आहे, त्यासाठी मिशेल मॅक्लेघनचे आभार. मी जेव्हाही येथे आलोय, तेव्हा त्याची मदत मिळाली. मी इथे थोडी गोलंदाजी आणि सरावही केला आहे. त्यामुळे येथे येणे, हे आठवणींना उजाळा देण्यासारखे आहे.’
त्याचे काही कुटुंबिय देखील सामन्यासाठी स्टेडियममध्ये येणार असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘कुटुंबातील सदस्यांसमोर खेळण्याचा दबाव नाही, उलट उत्सुकता आहे. मी सर्व आठवत आहे, जेव्हा मी पहिल्यांदा मुंबई सोडले आणि मुंबईला पहिल्यांदा परत आलो, लग्नसंमारंभासारख्या गोष्टींसाठी येथे येणे. माझ्यासाठी हे क्षण खूप खूप खास असणार आहेत.’
कानपूर कसोटीतील फलंदाजी विशेष
या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूरला झाला होता. या सामन्यात एजाज पटेल आणि रचिन रविंद्र यांनी मिळून अखेरच्या दिवशी अखेरच्या विकेटसाठी भागीदारी करताना ५२ चेंडू खेळून काढले होते आणि सामना अनिर्णित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ही खूप खास गोष्ट असल्याचे एजाज पटेल याने सांगितले.
त्याने सांगितले, ‘शक्य तितके चेंडू आम्ही सरळ खेळण्याबद्दल चर्चा केली होती. मी निकालाचा विचार जास्त करत नव्हतो. आमच्यासाठी हे क्षण खूप विशेष होते आणि मला वाटले ही एक उपरोधिक होते, की दोन भारतात जन्मलेले, पण न्यूझीलंडमध्ये मोठे झालेले खेळाडू क्रिकेटमधील एका मोठ्या संघाविरुद्ध खेळताना सामना अनिर्णित राहावा, यासाठी संघर्ष करत होते. मला वाटते की ही स्वतःमध्ये एक अद्भुत कथा आहे, आमच्यासाठी येथे असणे, हे विशेष होते आणि मला वाटते की सर्वकाही आश्चर्यकारक होते.’
कानपूर कसोटीत एजाज पटेलने २३ चेंडूत २ धावा केल्या होत्या, तर रचिन रविंद्रने ९१ चेंडूत १८ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“ओ पाजी मै गिर गया”, मुंबई कसोटीसाठी ‘प्लेइंग ११’ निवडण्यावरून वसीम जाफरने शेअर केले मजेशीर मीम
हरभजन सिंगने निवडली कसोटीतील सर्वकालिक ‘प्लेइंग ११’, या खेळाडूला दिली विवियन रिचर्ड्सची उपाधी
पुजारा-रहाणे नव्हे, तर ‘हा’ फलंदाज मुंबई कसोटीतून होऊ शकतो बाहेर; पाहा संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’