आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मधील आठवा सामना मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात झाला. हा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. कारण या सामन्यात पाकिस्तानने क्रिकेट विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत इतिहास रचला. या सामन्यात सर्वात मोठं योगदान होतं ते पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याचं, त्याने या सामन्यात शतकी (131) खेळी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. त्याबरोबरच त्याने पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने जबरदस्त फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यांनी 50 षटकांत 9 बाद 344 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने आपले 2 फलंदाज अवघ्या 37 धावांवर गमावले होते. त्यानंतर विश्वचषक पर्दापण करणाऱ्या अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी पाकिस्तानचा डाव सावरत 156 चेंडूत 176 धावांची मोठी भागीदारी केली. शफीक (113) बाद झाल्यानंतर रिझवानने सौद शकील (Saud Shakeel) बरोबर 95 आणि इफ्तिकार अहमद (Iftikhar Ahmed) बरोबर 37 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
रिझवानने मोडला 18 वर्षे जुना विक्रम
शेवटपर्यंत राहिलेल्या रिझवानने 121 चेंडूंचा सामना करत 3 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 131 धावांची विजयी खेळी केली. त्याने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पाकिस्तानसाठी सर्वोच्च वैयक्तिक खेळी करत 18 वर्षे जुना म्हणजे 2005 मध्ये कामरान अकमल (Kamran Akmal) याने केलेला विक्रम मोडीत काढला. अकमलने वेस्ट इंडिजविरुद्ध ब्रिस्बेन येथे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून 124 धावांची वैयक्तिक सर्वोच्च खेळी केली होती.
याचबरोबर रिझवान वनडे विश्वचषकात पाकिस्तानसाठी यष्टीरक्षक म्हणून सर्वोत्तम खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. या अगोदर हा कारनामा माजी कर्णधार सरफराज अहमद याने केला होता. त्याने 2015 विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध नाबाद 101 धावांची खेळी केली होती. (cricketer mohammad rizwan surpassed kamran akmal and recorded highest odi score as a wicketkeeper for pakistan cwc23)
हेही वाचा-
दिल्लीत टीम इंडियापुढे अफगाणी आव्हान, पाहुण्यांनी जिंकला टॉस; रोहितसेनेतून स्टार खेळाडू बाहेर- Playing XI
सचिनने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकलं असतं, तर भारत हरला असता! सेहवागचा 2011 वर्ल्डकपविषयी मोठा खुलासा