आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. आयपीएल २०२१ चा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडणार आहे. या लिलावात सर्व फ्रेंचायजी आपल्या संघात रिक्त असलेल्या जागा भरण्यावर भर देतील. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शकीब अल हसन यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक युवा खेळाडूदेखील या लिलावासाठी उपलब्ध असतील.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघासाठी आयपीएलचा तेरावा हंगाम निराशाजनक राहिला होता. आठ संघांमध्ये चेन्नईला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. चेन्नईला चौदाव्या हंगामासाठीचा संघ पूर्ण करण्यासाठी सात खेळाडूंनी आवश्यकता आहे. यापैकी एक जागा विदेशी खेळाडूची आहे. चेन्नई संघाकडे सध्या १९.९० कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे.
आज आपण अशा चार खेळाडूंविषयी जाणून घेऊया, ज्यांच्यावर चेन्नईचा संघ बोली लावू शकतो.
१) ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याच्यावर सीएसके व्यवस्थापन बोली लावण्याची शक्यता आहे. चेन्नई संघाला सध्या वरच्या क्रमांकावर खेळणाऱ्या विदेशी खेळाडूची आवश्यकता आहे. शेन वॉटसन निवृत्त झाल्याने चेन्नई संघात एका विदेशी खेळाडूची जागा रिक्त आहे. आक्रमक फलंदाज असलेला मॅक्सवेल उपयुक्त ऑफस्पिन गोलंदाजी करतो.
२) कृष्णप्पा गौतम
देशांतर्गत क्रिकेटमधील मोठ्या टी२० अष्टपैलूंमध्ये गणना होणार्या कृष्णप्पा गौतमवर चेन्नईचा संघ बोली लावू शकतो. कर्नाटकसाठी चमकदार कामगिरी करणारा गौतम आतापर्यंत आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स व किंग्स इलेव्हन पंजाब संघांसाठी खेळलेला आहे. खालच्या क्रमांकावर येऊन फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तसेच, चेन्नईच्या फिरकीसाठी मदतगार असणाऱ्या खेळपट्टीवर तो प्रभावी कामगिरी करू शकतो.
३) शिवम दुबे
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू शिवम दुबे याच्यावर सीएसके व्यवस्थापन बोली लावू शकते. उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज व डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज अशी त्याची ख्याती आहे. मागील दोन हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते. दोन्ही हंगामात त्याची कामगिरी सरासरी राहिल्याने बेंगलोर संघाने त्याला यावर्षी करार मुक्त केले आहे. सहाव्या-सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजाच्या साथीने तो अष्टपैलू म्हणून चेन्नई संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो.
४) पियुष चावला
मागील वर्षी चेन्नई संघाचा भाग असलेला पियुष चावला पुन्हा एकदा सीएसकेच्या संघात समाविष्ट होऊ शकतो. चेन्नई व्यवस्थापनाने मागील वर्षी त्याच्यावर ७ कोटींपेक्षा जास्त रक्कम देऊन आपल्या ताफ्यात सामील केले होते. मात्र, मागील आयपीएल युएई येथे झाल्याने त्याला आपला प्रभाव पाडता आला नव्हता. भारताच्या २०११ सालच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य असलेला चावला चेन्नईच्या खेळपट्टीवर दमदार कामगिरी करू शकतो. त्यामुळे, सीएसके व्यवस्थापन पुन्हा एकदा त्याला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“त्याला जाऊ देणे गरजेचे होते”, रूटने सांगितले मोईन अलीला मायदेशी पाठवण्यामागचे खरे कारण
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर आली अश्विनची प्रतिक्रिया, ‘या’ व्यक्तीला दिले शतकाचे श्रेय
नेटकरी जोमात, इंग्लंड कोमात! भारताच्या विजयानंतर चाहत्यांचा उत्साह, सोशल मिडीयावर मिम्सचा सुळसुळाट