कोरोना महामारीमुळे बंद असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज या कसोटी मालिकेने सुरू झाले होते. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्या दरम्यानच्या सामन्याने एकदिवसीय क्रिकेट ही पुन्हा सुरु करण्यात आले. याचसोबत आयसीसीने जाहीर केल्याप्रमाणे २०२३ च्या विश्वचषकासाठी ‘आयसीसी वर्ल्डकप सुपर लीग’ या स्पर्धेचा देखील श्रीगणेशा झाला.
तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिले दोन सामने यजमान इंग्लंडने आरामात जिंकले. पहिल्या सामन्यात डेव्हिड विलीच्या पाच बळींमुळे आयर्लंड १७२ च्या पुढे जाऊ शकले नाही. इंग्लंडने सॅम बिलींग्जच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १७३ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. दुसऱ्या सामन्यातही आयर्लंडने दिलेले २१२ धावांचे आव्हान जॉनी बेअरस्टोच्या ८२ धावांच्या बळावर ३२ षटकात पार केले.
आयर्लंड दोन्ही सामने हरला असला तरी एका खेळाडूने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो खेळाडू म्हणजे मालिकेतून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा अष्टपैलू खेळाडू कर्टिस कॅम्फर. या २१ वर्षीय खेळाडूने आपल्या फलंदाजी व गोलंदाजीने आयर्लंड संघाला दोन्ही सामन्यांत संघांला मानहानीकारक पराभवापासून दूर ठेवले. पहिल्या सामन्यात त्याने दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत असताना संयम राखत ११८ चेंडूत ५९ धावांची नाबाद खेळी केली. तर, गोलंदाजी करताना पहिल्याच षटकात टॉम बॅन्टन याला बाद केले. दुसऱ्या सामन्यातही कॅम्फरने ८७ चेंडूमध्ये ६८ धावा जमवत आयर्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. गोलंदाजीतही जेम्स विंस व टॉम बॅन्टन यांना बाद करत, सामन्यात रंगत आणायचा प्रयत्न केला.
कर्टिस कॅम्फर हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. आपल्या आजीच्या आयरिश पासपोर्टमुळे तो आयर्लंडसाठी खेळण्यास पात्र ठरला आहे. कर्टिसने द. आफ्रिकेच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचे देखील प्रतिनिधित्व केले आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये प्रथम नामिबिया दौऱ्यासाठी त्याची आयर्लंड वुल्फ ( आयर्लंड अ ) संघात निवड झाली. त्याने त्याच दौऱ्यावर आपले लिस्ट ए व टी२० पदार्पण केले. कॅम्फरने आत्तापर्यंत ३ टी२० सामने खेळताना १०७ च्या सरासरीने १०७ धावा काढलेल्या आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ६२ आहे.
इंग्लंड विरुद्ध त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आश्वासक फलंदाजी व १३५ किमी/ प्रतितास अशा वेगाने गोलंदाजी करत त्याने क्रिकेट समीक्षकांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. तरुण व शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याकारणाने तो योग्य मार्गदर्शन मिळाल्यास, आयर्लंड क्रिकेटसाठी भविष्यात महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो.
आयर्लंडला २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरायचे असेल तर, पॉल स्टर्लिंग, बालबर्नी, केविन ओब्रायन, क्रेग यंग या अनुभवी खेळाडूंसोबतच कर्टिस कॅम्फर, हेरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, मॅकब्रायन व मार्क अडायर या युवा खेळाडूंना देखील आपले योगदान द्यावे लागेल.
ट्रेंडिंग लेख –
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले
संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज, ज्यांनी शेवटच्या षटकात दिल्या ६ पेक्षाही कमी धावा
कट्टर दोस्त क्रिकेटर पुढे जाऊन झाले एकमेकांचे कट्टर दुश्मन, आज पहात नाही एकमेकांचे तोंड
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
मुंबई इंडियन्स आर्धी आयपीएल तर लिलावातच जिंकते, माजी क्रिकेटरने केले गमतीशीर विधान
विमानतळावर लाऊंजच्या एका कोपऱ्यात बसून राहिला ‘हा’ खेळाडू, जाणून घ्या कारण..