विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होताना पाहायला मिळत आहे. दुबळे समजले जाणारे संघ बलाढ्य संघांना धोबीपछाड देत आहेत. तसेच, स्पर्धेत शतकांचा पाऊस पडतानाही दिसत आहे. आतापर्यंत स्पर्धेत 17 सामने खेळले गेले आहेत. अशात स्पर्धेचा 18वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगणार आहे. यापूर्वी आपण हवामान, आमने-सामने आकडेवारी याविषयी सर्व काही जाणून घेऊयात…
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेचा 18वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (Australia vs Pakistan) संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना त्यांना जिंकावा लागणार आहे. एकीकडे पाकिस्तान संघाने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले होते, पण त्यांना तिसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. तसेच, ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या दोन सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, मागील सामन्यात त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले.
विश्वचषकात दोन्ही संघांची आमने-सामने आकडेवारी
वनडे विश्वचषकात उभय संघांची आमने-सामने आकडेवारी पाहायची झाली, तर ऑस्ट्रेलियाने 6 सामने, तर पाकिस्तानने 4 सामने जिंकले आहेत. पाकिस्तान संघ 12 वर्षांपूर्वी 2011च्या वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यशस्वी ठरला होता. तसेच, वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर इथे ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. उभय संघात आतापर्यंत 107 वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 69, तर पाकिस्तानने 34 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, 1 सामना बरोबरीत सुटला आणि 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.
खेळपट्टीची माहिती
बंगळुरू येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असते. मैदान लहान असल्यामुळे इथे मोठ्या धावसंख्येचे सामनेही पाहायला मिळतात. विश्वचषकातील या मैदानावरील हा पहिलाच सामना असेल, ज्यात फलंदाजांना चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. सामन्याच्या नाणेफेकीची वेळ 1.30 वाजता आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच, डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपवर या सिनेमाची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
संभावित प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोस हेझलवूड.
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ. (cwc 2023 aus vs pak 18th match preview weather and live stream all know here)
हेही वाचा-
बांगलादेशला धोबीपछाड देताच रोहितचे सर्वात मोठे विधान; म्हणाला, ‘सामनावीर पुरस्कार त्याला दिला पाहिजे…’
WPL साठी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर, असे आहेत संघ