इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दूसरा सामना काल (२० सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात खेळण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ८ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघानेही २० षटकात ८ बाद १५७ धावा केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने २ विकेट्स गमावत २ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने ४ धावा करत हा सामना आपल्या नावावर केला.
तसं तर दिल्ली संघातील सर्वच खेळाडूंनी संघाला घवघवीत यश मिळवून देण्यात योगदान दिले आहे. पण काही खेळाडूंची कामगिरी संघाच्या विजयासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरली. त्याच खेळाडूंची माहिती येथे देण्यात आली आहे. Delhi Capitals 5 Players Who Contributed Lot In Victory
मार्कस स्टोइनिस
आयपीएल २०२०मध्ये पहिल्यांदाच दिल्ली संघात सहभागी झालेल्या अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिसने कमालीचे प्रदर्शन केले. त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे दिल्ली पंजाबविरुद्धचा सामना जिंकू शकली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. स्टोइनिसने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २१ चेंडूत ५३ धावांची अफलातून खेळी केली. यात त्याच्या ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
याबरोबरच त्याने ३ षटके गोलंदाजी करताना २९ धावा देत २ विकेट्स चटकावल्या. महत्त्वाचे म्हणजे पंजाब संघाचा डाव सांभाळत असलेल्या मयंक अगरवाल आणि डावातील शेवटच्या चेंडूवर क्रिस जॉर्डनची विकेट घेत त्याने सामना बरोबरीत सोडला.
कागिसो रबाडा
दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने अपेक्षेप्रमाणे शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने गोलंदाजी करत असताना ग्लेन मॅक्सवेल आणि कृष्णप्पा गौतम यांची विकेट तर चटकावली. पण त्याने सुपर ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत संघाला सामना जिंकून दिला. त्याने सुपर ओव्हरमध्ये केवळ २ धावा देत निकोलस पूरन आणि केएल राहुल यांच्या विकेट्स घेतल्या.
आर. अश्विन
२०१० मध्ये पंजाब संघाचे नेतृत्त्व करणारा आर अश्विन हा यावर्षी दिल्लीच्या ताफ्यात सहभागी झाला आहे. त्याने आपल्या जुन्या संघाविरुद्ध (पंजाब) खेळताना उल्लेखनीय गोलंदाजी केली. त्याने एक षटक टाकत फक्त २ धावा देत २ विकेट्स चटकावल्या. यात करुन नायर आणि निकोलस पूरन यांच्या विकेट्सचा समावेश होता. त्याने घेतलेल्या या विकेट्समुळे पंजाबची मधल्या फळीतील फलंदाजीची कमान बिघडली. पण पुढे एक चेंडू पकडत असताना त्याला दुखापत झाली, त्यामुळे तो सामन्यातून बाहेर पडला.
श्रेयस अय्यर
दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाचा डाव सावरला. सलामीला फलंदाजीसाठी आलेले शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ४ षटकांच्या आतच पव्हेलियनला परतले. त्यांच्यापाठोपाठ चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरही अवघ्या ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे संघाचा डाव पहिल्या ५ षटकांतच ३ बाद १३ धावा इतका झाला होता. पण त्यानंतर अय्यरने मैदानावर उतरत ३२ चेंडूत ३९ धावांची दमदार खेळी केली. याबरोबरच त्याने चौथ्या विकेटसाठी रिषभ पंतसोबत ७३ धावांची भागिदारी रचली. तसेच, त्याने पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचाही शानदार झेल पकडला.
अक्षर पटेल
दिल्लीचा फिरकीपटू आर अश्विन जखमी झाल्यामुळे सामन्यातून बाहेर पडला. पण फिरकीपटू अक्षर पटेलने त्याची कमी भासू दिली नाही. पटेलने ४ षटके टाकत फक्त १४ धावा दिल्या आणि सर्फराज खानची एक विकेट चटकावली.
महत्त्वाच्या बातम्या –
अशा पद्धतीने खेळाडूंना बाद न करण्याची रिकी पाँटिंगने दिली होती ‘या’ खेळाडूला ताकीद
केएल राहुल आयपीएलच्या इतिहासात ‘असा’ विक्रम करणारा बनला पाचवाच यष्टीरक्षक
बाबारे! आयपीएलचा पहिला संघ ज्यांनी आतापर्यंत बदलेत एक-दोन नव्हे तब्बल १२ कर्णधार
ट्रेंडिंग लेख –
१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?
मुंबई इंडियन्स संघात असूनही कधीच खेळण्याची संधी न मिळालेले ६ स्टार खेळाडू
आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वात खराब गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज