आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी (२२ सप्टेंबर) हंगामातील ३३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला आठ विकेट्स राखून मात दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादला नऊ विकेट्स घेत १३४ धावांवर रोखले होते. तसेच त्यांच्या फलंदाजांनीही चांगले प्रदर्शन करत १७.५ षटकांमध्येच सामना जिंकला. सामन्यात मिळालेल्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत संघाच्या गोलंदाजांच्या प्रदर्शनावर खूप खुश दिसला.
दिल्लीच्या कागिसो रबाडाने ३ तसेच एनरिक नार्टजे आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत. कर्णधार रिषभ पंतने गोलंदाजांचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, “आमच्याकडे जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक गोलंदाज आहेत. संघासाठी ही खूपच चांगली गोष्ट आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात आमचे प्रदर्शन चांगले राहिले होते. आम्ही दुसऱ्या टप्प्यातही चांगली सुरुवात केली आहे. आमचे प्रशिक्षक रिकी पाॅंटिंग नेहमी सांगतात की, आपल्याला फक्त आपल्या प्रक्रियेवर लक्ष द्यायचे आहे आणि आम्ही तीच गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
या सामन्यात दिल्लीच्या एनरिक नाॅर्टजेने त्याच्या चार षटकात केवळ १२ धावा देत दोन विकेट्स मिळवल्या. नाॅर्टजेला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. याबाबत त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात न खेळणे दुर्भाग्यपूर्ण होते. मला आनंद आहे की, मी पुनरागमन केले आणि संघाच्या विजयामध्ये माझे योगदान दिले. खेळपट्टीवर थोडे गवत होते, ज्यामुळे आम्हाला थोडी मदत मिळाली. आम्ही गोष्टींना खूप साधे ठेवत होतो, ज्याचा आम्हाला फायदा मिळाला.”
दरम्यान, या सामन्यातील विजयानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत पुन्हा पहिल्या स्थानावर पोहचला आहे. दिल्ली कॅपिटल्सने खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत एका स्थानाने खाली सरकला आहे. सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर हैदराबाद संघ आता स्पर्धेत प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही. हैदराबादने हंगामात ८ सामने खेळले असून त्यातील ७ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाच्या खात्यात आतापर्यंत केवळ दोन गुण आहेत आणि गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानावर कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
संघप्रेमच म्हणावे..! दिल्लीच्या शिमरॉन हेटमायरची हटके हेयरस्टाईल चर्चेत, तुमचेही वेधेल लक्ष
गुणतालिकेत तळाशी असलेल्या हैदराबादचा पुन्हा ‘सनसेट’, हताश कर्णधाराने ‘यांच्या’वर फोडले खापर
अरे किती घाई! स्टंपिगच्या गडबडीत पंतकडून सुटला विलियम्सनचा झेल, गोलंदाज अश्विननं मुरडलं नाक