आयपीएलमध्ये काल 25 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला 44 धावांनी पराभूत केले. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करतांना दिल्ली संघाने 20 षटकांत 175 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नई संघ 131 धावाच करू शकला.
सीएसकेच्या डावाची पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली. सलामीवीर शेन वॉटसन 16 चेंडूत 14 धावा करून तंबूत परतला. अनुभवी फलंदाज मुरली विजयही खेळपट्टीवर जास्त काळ टिकला नाही. त्याने 15 चेंडूत 10 धावा केल्या. विजयनंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा फलंदाज फाफ ड्यूप्लेसिस हा एकमेव फलंदाज होता, ज्याने पुन्हा एकदा संघासाठी शानदार फलंदाजी केली. या सामन्यात त्याने 35 चेंडूत 43 धावा केल्या. या सामन्यात सीएसकेतर्फे फाफ व्यतिरिक्त कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.
चेन्नईचा हा या आयपीएल हंगामातील सलग दुसरा पराभव होता. याआधी त्यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध देखील पराभव स्विकारला होता.
दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर निराश होता. सामन्यानंतर प्रतिक्रिया देतांना तो म्हणाला, “आमच्या संघाने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले असे मला वाटत नाही. फलंदाजीमध्ये आम्हाला सुधारणा करावी लागेल. आमच्या फलंदाजांनी संथ गतीने धावा केल्या. खेळतांना काय चुका होत आहेत हे शोधण्याची आवश्यकता आहे. आम्हाला नवीन योजनेसह पुढच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करावे लागेल. मला वाटते की फिरकीपटुंना अद्यापही चांगली गोलंदाजी करता आली नाही. सामन्यात खेळाडूंकडून काही झेल सुटले आहेत, कारण रात्रीच्या वेळी क्षेत्ररक्षण करतांना दिव्याच्या प्रकाशामुळे त्रास होत आहे.”
पृथ्वी शॉने ठोकले अर्धशतक
चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने शानदार अर्धशतक झळकावले. पृथ्वीने केवळ 43 चेंडूत 64 धावा केल्या. त्याने या खेळीमध्ये 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. या तुफानी अर्धशतकामुळे दिल्लीचा संघ 176 ही धावसंख्या करू शकला. पृथ्वीव्यतिरिक्त डावखुरा फलंदाज रीषभ पंतने 26 चेंडूत 37 धावांची शानदार खेळी केली तर कर्णधार श्रेयर अय्यरने 22 चेंडूत 26 धावा केल्या.