-महेश वाघमारे
२००२ ची नेटवेस्ट ट्रॉफी (NatWest Trophy) भारतीय क्रिकेट इतिहासातील शानदार क्षणांपैकी एक आहे. कैफ आणि युवराजची ती भागीदारी, गांगुलीचे सेलिब्रेशन यासाठी ती मालिका कायम लक्षात राहते. पण त्याच मालिकेत, एक असा किस्सा सुद्धा घडलेला जो ड्रेसिंग रूममधील माहौल बिघडविण्यास पुरेसा होता.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली नवीन भारतीय संघाची उभारणी होत होती. दिमतीला सचिन, द्रविड, कुंबळे आणि श्रीनाथसारखे अनुभवी खेळाडू होते तर युवा हरभजन, जहीर, युवराज आणि कैफ आपला जम बसविण्याच्या प्रयत्नात होते. सोबतच जॉन राईट (John Wright) यांच्या रूपाने पहिला विदेशी कोच देखील आला होता. परंतु यादरम्यान ओवलच्या ड्रेसिंग रूममध्ये एक वेगळीच घटना घडली होती.
जॉन राईट न्यूझीलंडचे एक महान खेळाडू. क्रिकेटविश्वात परफेक्शनिस्ट म्हणून त्यांची ख्याती होती. राईट यांच्या येण्याने भारतीय संघ विश्वासपूर्ण वाटत होता. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि इतर तांत्रिक बाबींमध्ये आमुलाग्र बदल झालेला. राईट कायम प्रत्येक खेळाडूकडून सर्वोत्तम काढून घेण्याचा प्रयत्न करत.
त्यावर्षी वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) चांगलाच फॉर्ममध्ये होता. सचिनला चौथ्या क्रमांकावर पाठवून सेहवागला गांगुलीसोबत सलामीला पाठवण्याची राईट यांची योजना यशस्वी होत होती. आपल्या कोचच्या भरवशावर सेहवाग खरा उतरत होता आणि राईट त्याच्यावर खुश होत होते.
परंतु, अचानक सेहवाग बेजबाबदार फटका खेळून बाद होऊ लागला. राईट त्याला समजावत की, “जरा सांभाळून खेळ. काही चेंडू पाहून, मेरीटवर खेळ. तुझा जम बसल्यावर तुला कोणी अडवणार नाही.”
पण सेहवाग ऐकेल तेव्हा खरे ! तो तात्पुरता “हो” म्हणत पुन्हा तसेच करत असे.
नेटवेस्ट सिरीज सुरू झाली होती. तत्पुर्वी मायदेशात इंग्लंडने भारताला पराभूत केले होते आणि अंतिम सामन्यात फ्लिंटॉफने वानखेडेवर जो काही प्रकार केला होता त्यामुळे भारतीय संघ बदला घेण्याच्या इराद्याने दाखल झाला होता. भारत व इंग्लंडसोबतच श्रीलंका देखील तिसरा संघ म्हणून मालिकेत खेळत होता.
मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध सेहवागने आक्रमक अर्धशतक झळकावले पण अवसानघातकी फटका मारून तो बाद झाला. जॉन राईट यांनी ती गोष्ट नोटीस केली होती.
पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध ओवलच्या मैदानावर होता. जयसूर्याने टॉस जिंकून फलंदाजी घेतली परंतु जहीर खान आणि अजित आगरकर यांच्या घातक गोलंदाजीमुळे श्रीलंका २०२ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. भारत आरामात सामना जिंकू शकत होता.
भारताचा डाव सुरू झाल्यावर, ठरल्याप्रमाणे गांगुली सावधपणे खेळू लागला. पण डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवण्यात वाकबगार असलेल्या चामिंडा वासने गांगुलीला फसवलेच. सेहवाग मात्र आपल्या नेहमीच्या शैलीत खेळत होता. दोन सणसणीत चौकार मारत त्याने सुरुवात केली होती. सेहवागची अशी सुरुवात पाहून राइट मात्र वैतागले ते ड्रेसिंग रूममध्ये म्हणाले,
“आज सेहवागने शांतपणे खेळले पाहिजे. आज जर तो फालतू शॉट मारून आउट झाला तर मी त्याला सोडणार नाही !”
आणि.. काही वेळातच चामिंडा वासला षटकार मारण्याच्या नादात सेहवागने जयसूर्याच्या हाती झेल दिला. दोन्ही सलामीवीर बाद झाले होते आणि धावफलकावर होत्या अवघ्या २६ धावा. सेहवाग शिट्टी वाजवत ड्रेसिंग रूममध्ये आला.
सेहवागच्या पाठोपाठ राईट देखील ड्रेसिंग मध्ये घुसले. खेळाडूंनी ओळखले की काहीतरी राडा होणार आहे. खेळाडू आत मध्ये गेले तेव्हा राईट यांनी सेहवागची कॉलर पकडली होती आणि अस्सल इंग्रजी शिव्या हासडत होते. खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केले.
गांगुली तावातावाने बाल्कनीमध्ये आला. संघाचे मॅनेजर राजीव शुक्ला तेथून सामना पाहत होते. गांगुलीने त्यांना आतमध्ये घडलेले प्रकरण सांगितले. शुक्ला आतमध्ये आले तर सेहवाग रडत होता आणि जॉन राईट शेजारच्या लहानशा खोलीत सिगरेट ओढत होते.
खाली मैदानावर सचिन आणि मोंगियाने भागीदारी करत डाव सावरला. इकडे कुंबळे, द्रविड आणि राजीव शुक्ला यांनी परिस्थिती सांभाळली. थोड्यावेळाने, सचिन ४९ धावांवर बाद होत ड्रेसिंग रूममध्ये आला. त्याला ही घटना समजली परंतु मॅच संपेपर्यंत सर्वांनी शांत बसावे असे ठरले. शेवटी युवराज आणि कैफ यांनी आक्रमक खेळ्या करत मॅच जिंकवली.
गांगुली म्हणाला की, ” राईट यांनी सर्वांसमक्ष वीरूची माफी मागावी अन्यथा कोणीही मैदान सोडणार नाही.”
राजीव शुक्ला या घटनेची आठवण सांगतात की, “सचिन आणि कुंबळेने त्यावेळी राइट यांच्याशी चर्चा केली. आपण रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे त्यांनी मान्य केले पण या मागचा उद्देश वीरूचा खेळ सुधारावा एवढाच होता. या घटनेवर सचिनचे म्हणणे होते कि, झाले ते चुकीचे झाले परंतु जॉन यांनी सर्वांसमोर माफी मागणे योग्य ठरणार नाही. ते एक महान खेळाडू आणि आता संघाचे प्रशिक्षक आहेत.”
पुढे सेहवाग आणि राईट यांनी सामोपचाराने प्रकरण मिटवले. थोडे दिवस ही बातमी चर्चेत राहिली. भारतीय संघाने नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यावर सर्वच बातम्यांना पूर्णविराम मिळाला.
जॉन राइट यांचा सल्ला सेहवागने तेव्हाही मानला नाही आणि पूर्ण कारकीर्दीत तो आपल्या मनमौजी अंदाजातच खेळला. पुढे जॉन राईट यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. जॉन राइट यांनी भारतीय संघासोबतच्या आपल्या आठवणी ‘इंडियन समर’ या आपल्या पुस्तकात अगदी विस्तृतपणे लिहिल्या आहेत.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण