भारतीय ताफ्यात कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. यासाठी ब्रिटिश माध्यमांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जबाबदार धरले आहे. तर इंग्लंडचे माजी कर्णधार माईक अर्थटनने इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) पाचवा कसोटी सामना रद्द होण्याला जबाबदार धरले आहे.
मात्र, या दरम्यान इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचे (ईसीबी) मुख्य अधिकारी टॉम हॅरिसन यांनी याबाबत वेगळे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते पाचवा कसोटी सामना रद्द होण्याला आयपीएलचा काहीही संबंध नाही.
दरम्यान आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला टप्पा भारतात खेळविण्यात आला होता. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. आता उर्वरित सामने दुसऱ्या टप्प्यात युएईमध्ये होतील.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंडचे माजी कर्णधार माइक अर्थटन याबाबत स्काय स्पोर्ट्स सोबत बोलताना म्हणाले की, “पाचवा कसोटी सामना रद्द होण्याला मुख्य कारण आयपीएल आहे. खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभाग नोंदवायचा होता. निश्चितच बीसीसीआय आयपीएल संदर्भात चिंतित होते.”
मात्र, ईसीबीचे मुख्य अधिकारी टॉम हॅरिसनने याबाबत आपले मत व्यक्त करत म्हणाले, “मला नाही वाटत की, आयपीएलचा याच्याशी काहीही संबंध आहे. ही स्थिती आयपीएलमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे उद्भवलेली नाही. मी एका सेकंदासाठी देखील या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. हा मुद्दाच असू शकत नाही. कारण, भारत या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर होता.”
यानंतर हॅरिसन यांनी या कसोटी मालिकेच्या निकाला बाबत म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सोबत काही काम करायचे आहे. जेणेकरून एक औपचारिकरित्या याच्या निकालावर निर्णय घेतला जाऊ शकेल.”
तसेच हॅरिसनने सांगितले कि बीसीसीआयने या सामन्याला पुन्हा खेळण्यासाठीचा प्रस्ताव मांडला आहे जे की एक चांगली बातमी आहे.
हॅरिसन यांना विचारण्यात आले की, हा कसोटी सामना वेगळा खेळवला जाणार की याच मालिकेअंतर्गत खेळवला जाणार? जर हा एक वेगळा कसोटी सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला तर, भारत सध्याच्या मालिकेत विजयी घोषित केला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
याबाबत स्काय स्पोर्ट्स सोबत बोलताना हॅरिसन म्हणाले की, “मला वाटते की ही एक वेगळी परिस्थिती आहे. आम्हाला आणखी काही पर्याय दिले गेले आहेत, ज्यावर आम्ही विचार करू”
हा सामना पुढच्या वर्षी जुलै महिन्यात होऊ शकतो, जेव्हा भारतीय संघ पुन्हा मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली त्यांच्या खाजगी कामासाठी इंग्लंडला जाणार आहेत. तेव्हा ते २२ किंवा २३ तारखेला याबाबत हॅरिसन यांच्यासोबत या सामन्याच्या आयोजनाबाबत बैठक करु शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
–उर्वरित आयपीएलसाठी डेविड मलानऐवजी पंजाबने दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर केले शिक्कामोर्तब
–मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर आता इंग्लंडचे ‘हे’ ५ खेळाडू आयपीएलमधून घेऊ शकतात माघार
–भारीच ना! दक्षिण आफ्रिकेकडून ‘त्याने’ टी२० पदार्पण केले, नेतृत्वही केले आणि पहिल्याच चेंडूवर विकेटही घेतली






