सन 2021 ला टीम इंडिया इंग्लंड टूरवर गेली. 2021 पासून इंग्लंडच्या धरतीवर टेस्ट सीरिज जिंकण्याची असलेली इच्छा यावेळी पूर्ण करायच्या इराद्याने विराट कोहली आणि टीम इंडिया उतरलेली. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ या यंग ब्रिगेडने चारलेली. अगदी तीच कामगिरी इंग्लंडमध्ये करायचा इंडियाचा इरादा होता. टीम इंडिया आपला 14 वर्षाचा इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याचा दुष्काळ संपवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे लक्ष होते दोन दिग्गजांवर. एक होता टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि दुसरा इंग्लंडचा ऑल टाइम ग्रेट फास्ट बॉलर जेम्स अँडरसन. एक बॅटिंगचा बादशाह तर दुसरा बॉलिंगचा बॉस. वन लास्ट टाईम म्हणत या दोघांना त्या सीरिजमध्ये पाहण्यासाठी सारे जण आतुर होते.
हे दोघे एकमेकांविरुद्ध शेवटची सीरिज खेळतायेत असं म्हणण्याचं कारण होतं अँडरसनच वय. 38 वर्षांचा अँडरसन कदाचित यानंतर दिसणार नाही असंच साऱ्यांना वाटत होत. सीरिजला ट्रे़ंट ब्रिजच्या ड्रॉ टेस्टने सुरुवात झाली. लॉर्ड्सवर टीम इंडिया जिंकली. हेडिंग्लेत इंग्लंड सरस ठरली, तर ओव्हलवर जिंकून टीम इंडियाने आघाडी मिळवली. कोव्हिडमुळे पाचवी टेस्ट लांबणीवर पडली. या चार टेस्टमध्ये सर्वांची नजर होती त्या विराट आणि अँडरसन यांच्यातील लढाई थोड्या फार फरकाने का होईना अँडरसनने जिंकली. अगदी 2014 सारखी नाही, पण त्याच्या आसपास जाणारी नक्की होती.
सन 2014 चा टीम इंडियाने केलेला इंग्लंड दौरा खऱ्या अर्थाने विराट वर्सेस अँडरसन होता. भारताच्या नव्या पिढीकडे क्रिकेटची सूत्रे आलेले. सचिन, द्रविड, लक्ष्मणला रिप्लेस करणारे विराट पुजारा रहाणे आले होते. त्यातही विराटला सचिनच्या तोडीचा मानला जात होतं. दुसरीकडे इंग्लंडसाठी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड आपल्या करिअरच्या पीकवर होते. इथेच अँडरसन-कोहली रायवलरीची बीजे रोवली गेली. अँडरसनने विराटला बकरा बनवला. 8 पैकी चार इनिंगमध्ये विराटला आऊट केलं. विराटच्या आऊट होण्याचा एकच पॅटर्न होता. सहाव्या-सातव्या स्टंपवरील बॉलशी छेडछाड करायला जायचा आणि अँडरसनच्या जाळ्यात सापडायचा. टीम इंडियाने सीरिज गमावली आणि ‘पराभवाचा शिल्पकार’ अशा आशयाच्या हेडलाईन विराटच्या बाबतीत दिल्या गेल्या. विराटच काय कोणत्याही क्रिकेटप्रेमीला विराटची ती सीरिज विसरावीच वाटते.
त्या फेल्युअरनंतर विराट काही काळ खचला, पण तितक्याच जोमाने उभा राहिला. नेमकं त्याच वर्षी त्याच्याकडे टीम इंडियाचं कॅप्टनपद आलं. तिथून खऱ्या अर्थाने सारा गेम चेंज झाला. विराटमधील आग आणखी भडकली. जी त्याच्या बॅटिंगमध्ये दिसू लागली. वनडे आणि टी20 वर्ल्डकप गाजवले. आयपीएलच्या एका सिझनमध्ये जवळपास हजाराचा पल्ला गाठण्याच्या तो जवळ आला. दक्षिण आफ्रिकेत गेला आणि तिथेही दबंगई केली. त्याला पुन्हा इंग्लंड खुणावत होतं. तिकडे अँडरसन जुन्या वाईनप्रमाणे आणखीच मुरत चाललेला. ग्रेटनेसचे एक एक टप्पे पार करत आला. बॅटिंगमधील यशाचे प्रमाण विराटला मानलं जाऊ लागलेलं, तर बॉलिंगमधील लिजेंड अँडरसन ऑलरेडी बनलेलाच. 2018 मध्ये काय होणार याची सर्वांना उत्सुकता होती.
‘नया इंडिया’ म्हणत पोहोचलेली टीम इंडिया इंग्लंडशी भिडू लागली. या लढ्याचं नेतृत्व केलं स्वतः कॅप्टन, लिडर, लिजेंड विराट कोहलीने. चार वर्षांपूर्वी ज्या इंग्लंडमध्ये इंग्लिश बॉलर्सने विराटला लेझीम खेळायला लावलेली, त्याच इंग्लंडमध्ये विराट किंग म्हणून खेळत होता. पाच टेस्टची सीरिज टीम इंडिया हरली, पण विराट 593 रन्स करून बॉस बनलेला. ज्या अँडरसने चार वर्षापूर्वी त्याच्या नाकीनऊ आणलेले तोच अँडरसन त्याला एकदाही आऊट करू शकलेला नव्हता. फिट्मपफाट झालेली. दोन्ही दिग्गज एक-एकदा एकमेकांवर डॉमिनेट केलेले.
सन 2021 ला विराटचा फॉर्म दिसला नव्हता, पण अँडरसन त्याला फक्त दोनदा आऊट करू शकला. पाच मॅचची सीरीज चार टेस्टनंतर थांबवली गेली. राहिलेली एक टेस्ट पुढच्या वर्षी खेळण्याचं ठरलं. जवळपास वर्षभराच्या गॅपनंतर विराट आणि अँडरसन एकमेकांविरुद्ध दिसतील की नाही, याची शाश्वती नव्हती. मात्र, कदाचित नियतीला वेगळं मंजूर होत. वर्षभरानंतरही अँडरसन आणि आपल गतवैभव शोधत असलेला विराट समोरासमोर आले. विराटने काही कडक ड्राईव्ह मारले, तर अँडरसनने काहीवेळा त्याला बीट केले. मात्र, यावेळी अँडरसन त्याला आऊट करण्यात यशस्वी झाला नाही. मॉडर्न डे ग्रेट कदाचित हेच लास्ट टाईम भेटले. तेही एकदम हसत खेळत.
पुढे चार वर्षानंतर टीम इंडिया इंग्लंडला खेळायला जाईल, तेव्हा अँडरसन निश्चितच नसेल. मात्र, जेव्हा केव्हा टीम इंडिया आणि इंग्लंड आमनेसामने येतील, तेव्हा या दोन ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या गावसकरांनी भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून दिली, त्यांच्या दैदीप्यमान करिअरचा ‘असा’ झाला शेवट, वाचाच
भारतीय क्रिकेटमधील दुर्दैवाचं नाव- पुणेकर वसंत रांजणे, विंडीजविरुद्ध खेळताना रक्ताने माखलेला मोजा