गॉल येथे चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादित केले. श्रीलंकेने या सामन्याच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या डावात त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्याने इंग्लंडला सामन्याच्या चौथ्या दिवशीच सोपा विजय मिळाला.
इंग्लंडला या सामन्यात चौथ्या डावात १६४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. ते त्यांनी ४ गडी गमावून पूर्ण केले. एकवेळ त्यांचा डावही ४ बाद ८९ अशा संकटात सापडला होता. मात्र त्यांनतर सलामीवीर डॉमिनिक सिबलीने नाबाद ५६ धावांची तर जोस बटलरने ४८ चेंडूत ४६ धावांची आक्रमक खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात ३८१ धावा उभारल्या होत्या. यात अँजेलो मॅथ्यूजच्या ११० धावांचा सर्वात मोठा वाटा होता. त्याच्या प्रत्युतरात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची २ बाद ५ अशी नाजूक अवस्थाही झाली होती. मात्र त्यांनतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार जो रूटने सामन्याची सूत्रे हातात घेत झुंजार खेळी केली.
रूटने ३०९ चेंडूत १८६ धावांची मॅराथॉन खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच इंग्लंडने ३४४ धावांची मजल मारली. त्यासह श्रीलंकेला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली होती. मात्र त्यांना या आघाडीचा फायदा उचलण्यात अपयश आले. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव १२६ धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने १६४ धावांचे आव्हान सहज पार करत क्लीन स्वीप साधला.
या सामन्यात शानदार शतकी खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधार रूटलाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच मालिकेत १०६ च्या सरासरीने दोन शतकांसह तब्बल ४२६ धावा कुटणाऱ्या जो रूटलाच मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक:
श्रीलंका: पहिला डाव – ३८१/१० , इंग्लंड: पहिला डाव – ३४४/१०
श्रीलंका: दुसरा डाव – १२६/१० , इंग्लंड: दुसरा डाव – १६४/४
महत्वाच्या बातम्या:
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तारखेत बदल, जाणून घ्या नवे वेळापत्रक
हॅपी बर्थडे मिस्टर डिपेंडेबल! चेतेश्वर पुजारावर आजी-माजी खेळाडूंनी केला शुभेच्छांचा वर्षाव