इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (australia vs england) यांच्यात खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेत (ashes series) ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने शनिवारी (११ डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्यात ९ विकेट्स राखून विजय मिळवला. इंग्लंडला या पराभवानंतर मोठा झटका लागला असून सामना संपल्यानंतर आयसीसीने देखील त्यांच्यासाठी एक वाईट बातमी जाहीर केली. आयसीसीने इंग्लंडच्या खेळाडूंना या सामन्यासाठी मिळणारे १०० टक्के वेतन कापून घेतले आहे. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील त्याचे पाच गुण देखील वजा केले आहे.
इंग्लंड संघाने सामन्यादरम्यान गोलंदाजी करण्यासाठी जास्त वेळ घेतल्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. आता इंग्लंडच्या खेळाडूंना या सामन्यासाठी मिळणाऱ्या वेतनापैकी १०० टक्के रक्कम दंडाच्या रूपात वसूल केली जाईल. इंग्लंड संघाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडला देखील आयसीसीने सामन्यात मिळणाऱ्या वेतनाच्या १५ टक्के रक्कमेचा दंड ठोठावला आहे. ट्रेविसने डावाच्या ७७ व्या षटकात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी अपशब्द वापरले असल्याचे समोर आले होते. याच कारणास्तव त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
आयसीसीच्या नियमांनुसार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जर कोणत्याही संघाने एक षटक टाकण्यासाठी जास्त वेळ लागला, तर त्यांचा एक गुण कापला जातो तर खेळाडूंना एका सामन्यात मिळणाऱ्या वेतनापैकी एका संथ षटकासाठी २० टक्के रक्कम कापली जाते. या सामन्यासाठी रेफ्री असलेल्या डेविड बून यांच्यामते अपेक्षित षटकांपेक्षा पाच षटके कमी टाकल्यामुळे इंग्लंडवर ही कारवाई केली गेली आहे.
दरम्यान, ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसापासून वर्चस्व निर्माण केले होते. इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे पहिल्या डावात अवघ्या १४७ धावांवर सर्वबाद झाला होता. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४२५ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. पहिल्या डावाच्या अंती ऑस्ट्रेलियाने २७८ धावांची आघाडी घेतली होती.
इंग्लंडला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या करण्याची संधी होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लडने दुसऱ्या डावात दोन बाद २२० धावा केल्या होत्या. मात्र, चौथ्या दिवशी संघाच्या बाकीच्या सर्व विकेट्स खूपच स्वस्तात गमावल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडचा सर्व संघ २९७ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला शेवटच्या डावात विजयासाठी अवघ्या २० धावांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य अवघ्या ५.१ षटकात गाठले.
महत्वाच्या बातम्या –
पीएसएल २०२२ रिटेंशन: आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ विदेशी खेळाडूंना लागली लॉटरी
ज्याच्या नेतृत्वात आयपीएल खेळला, त्याचीच विकेट घेण्यासाठी उत्सुक आहे ‘हा’ श्रीलंकेचा युवा खेळाडूू
‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्या’सोबत दिसला एमएस धोनी; भन्नाट नवीन लूकसह ‘माही’चा फोटोही व्हायरल