टी20 विश्वचषक 2024 साठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं जोस बटलरला संघाचा कर्णधार नेमलंय. सध्या इंग्लंडचे अनेक खेळाडू आयपीएल 2024 मध्ये खेळत आहेत. टीम जाहीर केल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानं आयपीएल संघांना मोठा धक्का दिला आहे.
वास्तविक, इंग्लंडच्या ज्या खेळाडूंचा समावेश विश्वचषक संघात झाला, ते खेळाडू आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये खेळू शकणार नाहीत. 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडचे खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी परततील, असं बोर्डानं म्हटलंय. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून संघाची घोषणा केली.
बोर्डानं असंही लिहिलं की, “इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारे खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी मायदेशात परततील. ही मालिका 22 मे पासून सुरू होणार आहे. सध्या जोस बटलर, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन आणि फिलिप सॉल्ट यांच्यासह अनेक खेळाडू आयपीएल 2024 मध्ये खेळत आहेत.
आयपीएल 2024 चा पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी खेळला जाईल. यानंतर 22 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर 24 मे रोजी खेळला जाईल आणि त्यानंतर अंतिम सामना 26 मे रोजी खेळला जाईल. इंग्लंडला 22 मेपासून पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी त्यांचे खेळाडू मायदेशात परततील. अशा परिस्थितीत आयपीएल संघांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
2024 टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ – जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टॉपली, मार्क वुड
टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा पहिला सामना स्कॉटलंडशी होणार आहे. हा सामना 4 जून रोजी खेळला जाईल. इंग्लंडचा संघ 31 मे रोजी बार्बाडोसला रवाना होणार आहे. इंग्लंडचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना 8 जून रोजी खेळला जाईल. 13 जून रोजी इंग्लंड आणि ओमान यांच्यात सामना होणार आहे. यानंतर त्यांचा सामना नामिबियाशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जोफ्रा आर्चर परतला, ख्रिस वोक्सला संधी नाही; गतविजेत्या इंग्लंडनं जाहीर केला टी20 विश्वचषकासाठी संघ
आयपीएल दरम्यानच टी20 वर्ल्ड कपसाठी रवाना होणार टीम इंडिया, तारीख आली समोर