विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वासाठी (जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३) भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून सुरुवात करेल. भारत या दौऱ्यामध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामातही अंतिम फेरी गाठायची असल्यास भारतीय संघाला काय करावे लागेल, याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याने समीकरण समजावून सांगितले.
तरच भारत गाठू शकतो चॅम्पियनशिपची अंतिम फेरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताने प्रवेश केला होता. मात्र, एजबॅस्टन येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करत विजेतेपद पटकावले.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच भारत दुसऱ्या पर्वाची सुरुवात करेल. पहिल्यावेळी हुकलेले विजेतेपद मिळविण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या चॅम्पियनशिपच्या भारताच्या मोहिमेबाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने आपल्या यूट्यूब चॅनलवरून मत मांडले.
तो म्हणाला, “भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वात एकूण १९ सामने खेळायचे आहेत. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना कमीत कमी १३ सामने जिंकावे लागतील. घरच्या मैदानांवर भारत वरचढ ठरेलच. मात्र, स्पर्धेला इंग्लंडमधून सुरुवात होत असताना येथे देखील त्यांना चमकदार कामगिरी करावी लागेल. येथे पिछाडीवर पडल्यास संघाला नुकसान सोसावे लागेल.”
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, अभिमन्यू ईस्वरन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, वृद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ तारखेला सुरू होऊ शकतो ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’चा दुसरा हंगाम
आपल्या आजवरच्या कारकिर्दीबाबत रिषभ म्हणाला, “हा अद्भुत प्रवास”