इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यात पहिल्या २ कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळी करत यजमान संघावर १-० ने आघाडी मिळवली होती. मात्र, यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने देखील दमदार खेळी करत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. यानंतर सर्वत्र भारतीय संघावर टीका केली जात होती. असे असले तरी, इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने मात्र इंग्लंड संघाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
नासिरने या मालिकेतील भारतीय संघाच्या उत्साहाचे कौतुक केले आहे. नासिरने इंग्लंडला वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील भारतीय संघाच्या पुनरागमनाची आठवण करून दिली. ज्यामध्ये भारतीय संघाने ऍडलेडमधील कसोटी पराभवानंतर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पुनरागमन केले होते.
नासिरने ‘द टेलिग्राफ’मधील एका स्तंभात याबाबत मत व्यक्त करताना लिहिले, “हेडींग्लेमधील सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यांनी दोन्ही ठिकाणावरून चेंडूला उत्कृष्टपणे स्विंग केले. त्याउलट भारतीय गोलंदाजांनी चेंडूला अजिबात स्विंग केले नाही.”
“मात्र, इंग्लंडने एक गोष्ट नक्की करावी, भारतीय संघाने पराभवानंतर पुनरागमनासाठी दमदार तयारी चालू केली आहे. त्यामुळे गुरुवारपासून ओव्हलवर सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाबाबत गाफील राहू नये. कारण त्यांच्या पुनरागमनासाठी हे मैदान पोषक आहे. असे मैदान त्यांना नेहमी मदत करते,” असेही नासिर म्हणाला.
नासिरने इंग्लंडला ऍडलेडवरील सामन्याची देखील आठवण करून दिली. ज्यामध्ये भारतीय संघ केवळ ३६ धावांवर सर्वबाद झाला होता आणि तो सामना देखील गमावला होता. मात्र, कोहलीच्या अनुपस्थितीत देखील भारतीय संघाने त्या मालिकेत दमदार पुनरागमन केले. आणि ती मालिका २-१ ने आपल्या खिशात टाकली. कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत असला तरी, भारतीय संघाकडे संघर्ष करण्याची ताकत आहे. याचीही नासिरने आठवण करून दिली.
दरम्यान, तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर दोन्ही संघ सध्या या मालिकेत १-१ ने बरोबरीत आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंडची महिला गोलंदाज केट क्रॉसला खेळायचंय चेन्नई सुपर किंग्स संघात, कारणही आहे विशेष
–जड्डू इस बॅक! लीड्समध्ये दुखापतग्रस्त झालेल्या जडेजाने चौथ्या कसोटीपूर्वी सुरु केला नेट्समध्ये सराव, पाहा फोटो
–तब्बल २३४३ दिवस कसोटीमध्ये अव्वल राहिलेल्या स्टेनकडे एकेकाळी बूट घ्यायलाही नव्हते पैसे, वाचा त्याचा प्रवास