---Advertisement---

ENGvIND, 2nd Test, 3rd Day: ‘कर्णधार’ रुटची नाबाद दीडशतकी खेळी, इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात; २७ धावांची मिळाली आघाडी

On: शनिवार, ऑगस्ट 14, 2021 11:09 PM
---Advertisement---

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या सामन्याता शनिवारी (१४ ऑगस्ट) तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने १२८ षटकात सर्वबाद ३९१ धावा केल्या आहेत. याबरोबरच इंग्लंडने २७ धावांची आघाडी मिळवली आहे.

जो रुट आणि मोईन अलीने तिसऱ्या सत्राचीही सुरुवात चांगली केली होती. या दोघांनी धावफलक हलता ठेवत अर्धशतकी भागीदारी केली. पण अखेर १११ व्या षटकातील ५ व्या चेंडूवर इशांत शर्माने अलीला विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. अली २७ धावा करुन बाद झाला. त्याच्यापुढच्याच चेंडूवर इशांतने सॅम करनला शुन्यावर माघारी धाडले. त्यामुळे भारताला सलग २ चेंडूत २ विकेट्स मिळाले.

त्यानंतर ऑली रॉबिन्सन ६ धावांवर मोहम्मद सिराजविरुद्ध ११७ व्या षटकात पायचीत झाला. तर १२५ व्या षटकात मार्क वूड ५ धावांवर धावबाद झाला. असे असले तरी एका बाजूने जो रुटने आपला शानदार खेळ सुरु ठेवला होता. त्याने या सत्रादरम्यान दिडशतकी खेळी पूर्ण केली. त्याला अखेरीस अँडरसनने चांगली साथ दिली होती. पण शेवटी १२८ व्या षटकात मोहम्मद शमीने अँडरसनला त्रिफळाचीत करत इंग्लंडचा डाव ३९१ धावांवर संपवला. जो रुट ३२१ चेंडूत १८० धावा करुन नाबाद राहिला. त्याच्या या खेळीत त्याने १८ चौकार मारले.

रुटच्या शतकाने इंग्लंड ३०० धावा पार

पहिले सत्र इंग्लंडकडू जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी पूर्ण खेळून काढताना भारताच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नव्हते. दुसऱ्या सत्राचीही सुरुवात त्यांनी चांगली केली होती. पण अखेर मोहम्मद सिराज भारताच्या मदतीला आला आणि त्याने डावाच्या ७९ व्या षटकात बेअरस्टोला विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. बेअरस्टो १०७ चेंडूत ७ चौकारांसह ५७ धावा करुन माघारी गेला. तो बाद झाल्याने त्याची आणि रुटची १२१ धावांची भागीदारी तुटली.

तो बाद झाल्यानंतर रुटला साथ देण्यासाठी जोस बटलर ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. दरम्यान, ८२ व्या षटकात रुटने त्याचे २२ वे कसोटी शतक पूर्ण केले. रुट एकबाजू सांभाळत असताना बटलरनेही त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण ५४ धावांची अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर बटलर २३ धावांवर बाद झाला. रुट आणि बटलरची जोडी इशांत शर्माने तोडली. त्याने बटलरला ९१ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्रिफळाचीत केले.

त्यानंतरही रुटने आपला चांगला खेळ कायम ठेवला. त्याला मोईन अलीने साथ देण्यास सुरुवात केली असून रुट आणि अलीने दुसऱ्या सत्राखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी दुसऱ्या सत्राखेरपर्यंत नाबाद ३१ धावांची भागीदारी करताना इंग्लंडला ९८ षटकांत ५ बाद ३१४ धावसंख्येपर्यंत पोहचवले. या सत्रादरम्यान रुटने कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावांचा टप्पाही पार केला आहे.

रुट-बेअरस्टोची शतकी भागीदारी

तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ४५ षटके आणि ३ बाद ११९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. इंग्लंडकडून दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेली जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांची जोडी मैदानात उतरली. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच दुसऱ्याच षटकात जो रुटने अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी पुढेही चांगली भागीदारी करणे सुरु ठेवत भारताच्या गोलंदाजांना ७३ षटकांपर्यंतही एकही यश मिळू दिले नाही. यादरम्यान, त्यांनी अनेक आक्रमक फटकेही खेळले.

भारताकडून मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा अशा सर्व गोलंदाजांनी या दोघांची भागीदारी तोडण्याचा प्रयत्न केला. पण रुट आणि बेअरस्टोने दोघांनी ७२ व्या षटकात शतकी भागीदारी पूर्ण केली आणि इंग्लंडला २०० धावांचा टप्पाही ओलांडून दिला. दरम्यान ७२ व्या षटकात शतकी भागीदारी होण्याबरोबरच बेअरस्टोचे वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण झाले. हे त्याचे २२ वे कसोटी अर्धशतक ठरले.

रुट आणि बेअरस्टोने तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र पूर्ण खेळून काढले. त्यामुळे पहिल्या सत्रात इंग्लंडच्या पहिल्या डावात ७३ षटकात ३ बाद २१६ धावा झाल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---