शनिवारी (२० ऑगस्ट) भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात दुसरा वनडे सामना खेळला गेला. हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने नाणेफेक जिंकत झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ३९ षटकात सर्व १० विकेट्स गमावल्या आणि १६१ धावांवर संघ गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने आक्रमक खेळ दाखवत ५ विकेट्स गमावत २६ षटकात झिम्बाब्वेचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामन्यासह मालिकेवरही नाव कोरले.
आता या सामन्यातील भारतीय फलंदाजांच्या आक्रमतेवर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरिया याची लक्षवेधी प्रतिक्रिया आली आहे. कानेरियाने भारतीय फलंदाजांचे कौतुक केले आहे.
झिम्बाब्वेच्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. त्यांनी संघाच्या ५ धावांवरच पहिली विकेट गमावली. कर्णधार केएल राहुल वैयक्तिक एका धावेवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि शुबमन गिल यांच्यात चांगली भागीदारी रंगत असताना तनाका चिवांगाने धवनला झेलबाद केले. धवन वैयक्तिक ३३ धावांवर बाद झाला. पुढे इशान किशनने ६ धावांवरच आपली विकेट गमावली. त्यापाठोपाठ शुबमन गिलही ३३ धावांवरच पव्हेलियनला परतला.
मात्र पुढे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संजूने संघाची रुळावरून खाली घसरत असलेली गाडी सांभाळली. त्याने आक्रमक खेळ दाखवत ३९ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या आणि २६ षटकातच संघाला सामना जिंकून दिला.
भारताचे फलंदाज मैदानावर सेट होऊन आरामात ५० षटकांचा खेळ करत सामना जिंकू शकले असते. परंतु सलामीवीरांपासून ते मधल्या फळीपर्यंत सर्वांनी आक्रमकता दाखवली आणि शक्य तितक्या वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला. भारतीय फलंदाजांच्या याच आक्रमकतेने कानेरियाला प्रभावित केले आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर भारतीय फलंदाजांचे कौतुक करताना कानेरिया म्हणाला की, “बरेचसे पाकिस्तानी चाहते टीका करताना असे म्हणत आहेत की, झिम्बाब्वेच्या १६२ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने त्यांच्या ५ विकेट्स गमावल्या. परंतु आपण भारतीय फलंदाजांच्या आक्रमकतेचे कौतुक करायला पाहिजे. त्यांनी आक्रमक खेळ दाखवला आणि २५ व्या षटकातच सामना संपवला. अशाच परिस्थितीत जर पाकिस्तानचा संघ असता, तर त्यांनी हे आव्हान पूर्ण करायला नक्कीच ५० षटके खेळली असती.”