इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) (IPL) स्पर्धेला २००८ मध्ये प्रारंभ झाला होता. अवघ्या काही वर्षातच ही स्पर्धा जगभरात प्रसिद्ध झाली होती. ही स्पर्धा सध्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू सहभाग घेत असतात. २००८ नंतर प्रत्येक वर्षी ही स्पर्धा त्याच उत्साहात सुरू होत असते. ही स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एखाद्या सणासारखीच आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या १४ वर्षांच्या इतिहासात अशा काही गोष्टी घडल्या आहेत, ज्याची चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु, त्या खऱ्या नसून खोट्या आहेत. (Five ipl myths about ipl which is not true)
१) चेन्नई आणि राजस्थान संघांवर मॅच फिक्सिंगमुळे बॅन :
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना २०१५ मध्ये बॅन करण्यात आले होते. ज्यामुळे हे दोन्ही संघ २०१६ आणि २०१७ हंगामातून बाहेर झाले होते. या दोन्ही संघांना मॅच फिक्सिंगमुळे बाहेर करण्यात आले होते, असे म्हटले जात होते. परंतु, हे खोटं आहे.
तर झाले असे होते की, चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थानचे मालक राज कुंद्रा यांना स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या फ्रँचायझींवरही बीसीसीआयने २ वर्षांची बंदी घातली होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०१८ मध्ये आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
२) मुंबई इंडियन्स पंचांना खरेदी करतात :
मुंबई इंडियन्स या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळेस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. अनेकदा क्रिकेट चाहत्यांकडून आरोप करण्यात येतो की, मुंबई इंडियन्स संघ आयपीएल सामन्यापूर्वी पंचांना खरेदी करत असतो. ज्यामुळे सामन्यातील सर्व निर्णय हे मुंबई इंडियन्स संघाच्या दिशेने जात असतात. परंतु हे खोटं आहे.
मुंबई इंडियन्स संघ हा यशस्वी संघ आहे, याचे कारण संघातील खेळाडू आहेत. मुंबई संघातील अनेक खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. हेच कारण आहे की, मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. क्रिकेटमध्ये पंचांकडून चूक होणे स्वाभाविक असते, कारण त्यांच्यावर अतिरिक्त दबाव असतो. याचा अर्थ असा मुळीच नाहीये की, मुंबई इंडियन्स संघ पंच खरेदी करतात.
३) आयपीएल स्पर्धा फिक्सिंग असते :
जगातील सर्वोत्तम लीग स्पर्धेला फिक्स असल्याचे देखील म्हटले जाते. अनेकदा असे म्हटले जाते की, आयपीएल स्पर्धेतील सामने फिक्सिंग असतात. परंतु, असे काहीच नाहीये.
ज्या पद्धतीने खेळाडू आयपीएल सुरू होण्याच्या २-२ महिन्यापूर्वी स्पर्धेचा सराव करतात आणि सामन्यांमध्ये सर्वस्व पणाला लावून देतात. तसेच संघ हरला तर खेळाडू मैदानावरच भावूक होतात. अशा परिस्थितीत आयपीएलला फिक्स लीग म्हणणे चूकीचे आहे. भारतीय खेळाडूंसह परदेशातील खेळाडू देखील या स्पर्धेत खेळताना दिसून येतात. तसेच या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे आयपीएल स्पर्धेला फिक्स लीग म्हणणे चुकीचे आहे.
४) डेक्कन चार्जर्स सनरायझर्स हैदराबाद आहे :
अनेकांना वाटते की, डेक्कन चार्जर्स हाच सनरायझर्स हैदराबाद संघ आहे. हे दोन्ही हैदराबादचे प्रतिनिधित्व करत असले, तरी हे वेगवेगळे संघ आहेत.
डेक्कन चार्जर्स संघाने २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाने ५ वर्ष या स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले. २००९ मध्ये या संघाला जेतेपद मिळवण्यात यश आले होते. परंतु, २०१२ मध्ये हा संघ बँकक्रप्ट झाला होता. त्यानंतर सन टीव्हीने ही फ्रँचायझी विकत घेतली आणि सन २०१३ मध्ये सनरायझर्स हैदराबाद या नवीन नावाने आयपीएलमध्ये आपला संघ लॉन्च केला. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादमध्ये डेक्कन चार्जर्सच्या खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे या दोन फ्रँचायझी वेगळ्या असल्या तरी डेक्कन चार्जर्स ही सनरायझर्स हैदराबाद आहे, असा लोकांना अजूनही विश्वास आहे.
५) ख्रिस मॉरिस आयपीएल स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू :
आयपीएल २०२१ मध्ये झालेल्या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ख्रिस मॉरिसवर सर्वात जास्त बोली लागली होती. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने १६.५ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे,असे म्हटले जाते. परंतु हे खोटं आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १७ कोटी रुपये देऊन रिटेन केले होते. तसेच आयपीएल २०२२ साठी लखनऊ फ्रँचायझीने केएल राहुलला १७ कोटी रुपयांसह संघात घेतलं आहे. त्यामुळे विराट कोहली आणि केएल राहुल आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू आहे.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय दिग्गज म्हणतोय, “भुवनेश्वरचे भवितव्य काय?”
हार्दिकने सांगितले आपले पुढील ध्येय; म्हणाला…
रोहित अँड कंपनी अहमदाबादमध्ये दाखल, ‘इतके’ दिवस खेळाडू राहाणार क्वारंटाईन