भारतीय संघातील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही फलंदाज गेल्या महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. अनेकांनी त्यांना संघाबाहेर करण्याची मागणी देखील केली होती. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील (South Africa vs India) दुसऱ्या डावात दोघांनी अप्रतिम कामगिरी करत शतकी भागीदारी केली आहे. या कामगिरीने त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. दरम्यान, सामना झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने आपले मत मांडले.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ अडचणीत आला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने १११ धावांची भागीदारी केली होती. चेतेश्वर पुजाराने ५३ धावांची खेळी केली, तर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) ५८ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघासमोर २४० धावांचे आव्हान दिले आहे.
चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या दिवसाच्या (५ जानेवारी) समाप्तीनंतर म्हटले की, “संघ व्यवस्थापन नेहमीच मदत करत आहे. कोचिंग स्टाफ, कर्णधार, सर्वजण सर्व खेळाडूंच्या पाठीशी आहेत. आम्ही कठोर परिश्रम करत आहोत. अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला धावा करता येत नाही. परंतु, एक क्रिकेटपटू म्हणून महत्त्वाची गोष्ट म्हणजे दैनंदिन दिनचर्या पाळणे आणि आपल्या खेळात सुधारणा करणे.”
तसेच जेव्हा त्याला विचारण्यात आले की, “अजिंक्य रहाणे दबावात होता का? कारण सुनील गावसकरांनी (Sunil gavaskar) म्हटले होते की, त्याचा हा शेवटचा सामना असू शकतो.” या प्रश्नाचे उत्तर देत चेतेश्वर पुजारा म्हणाला की, “आम्हाला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही सनी भाईंकडून नेहमीच शिकत असतो आणि जेव्हाही मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी नेहमीच साथ दिली आहे.”
“हो, अशी वेळ देखील येते जेव्हा, तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये नसता. त्यामुळे प्रश्न तर उपस्थित होणार. परंतु, आमचा आत्मविश्वास वाढला आहे. मी आणि अजिंक्य आम्ही आमच्या खेळासाठी कठोर परिश्रम करत आहोत आणि एक म्हण आहे ‘फॉर्म तात्पुरता असतो, पण ‘क्लास’ हा कायमचा असतो.’ हे येथे अगदी बरोबर आहे,” असे चेतेश्वर पुजारा म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
हे नक्की पाहा :