जगभरातील घातक वेगवान गोलंदाजांची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा त्यामध्ये भारतीय संघाच्या जसप्रीत बुमराह याचे नाव आवर्जुन घेतले जाते. बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडला आहे. बुमराह सध्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग आहे. त्याने 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजीचे दर्शन घडवले. त्याच्या गोलंदाजीमुळे संपूर्ण पाकिस्तान संघ 191 धावांवर बाद झाला. अशात या सामन्यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंच याला बुमराहपासून वाचण्याची पद्धत विचारली, तेव्हा त्याने हैराण करणारा सल्ला दिला.
फिंचची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलताना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचे तोंडभरून कौतुक केले. फिंच म्हणाला की, बुमराह चेंडूला फक्त उजव्या हाताच्या फलंदाजाच्या जवळच आणू शकत होता, पण त्याने हळूहळू चेंडू दूर नेण्यासही सुरुवात केली आहे.
फिंच म्हणाला, “बुमराहने जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली होती, तेव्हा तो मुख्यत: उजव्या हाताच्या फलंदाजांना इनस्विंग करायचा, ज्यात सरळ लाईन पकडण्याची क्षमता होती. त्यानंतर एका मालिकेत त्याने न थांबता आऊटस्विंगर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि नंतर कधी-कधी इनस्विंगही करत राहिला. त्यावेळी तुम्ही नेहमी म्हणता, ‘वाह, माझ्या फुटवर्कचे इथे काय होणार आहे,’ कारण हे पाहणे खूपच कठीण आहे.”
बुमराहमुळे फिंच निवृत्त
फिंचला जेव्हा विचारले गेले, की, बुमराहचा सामना करण्याचा सोपा मार्ग काय आहे? त्यावर त्याने मजेशीर अंदाजात उत्तर दिले की, माझ्याप्रमाणे निवृत्ती घ्या. खरं तर, फिंचने याचवर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच, फेब्रुवारी 2023मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
तो म्हणाला, “त्याचे मनगट खूपच चांगले आहे. तो फक्त आत किंवा दूरवरून थोडा बदल कतो. तेव्हा अशा व्यक्तीसोबत ज्याचा हात प्रत्येक ठिकाणी असेल, त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करणे वास्तवात कठीण होऊ शकते. तो असा व्यक्ती आहे, जो अद्भूत आहे. तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंना सातत्याने बाद करतो. ज्याप्रमाणे मी निवृत्त झालो, तुम्हीही तसेच करा.”
विशेष म्हणजे, जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडे असे काही चेंडू आहेत, जे सर्वोत्तम फलंदाजांच्याही दांड्या गुल करू शकतात. बुमराहने अनेक विक्रम मोडत विरोधी संघाच्या फलंदाजांना धडकी भरवली आहे. आता भारतीय संघ 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेशविरुद्ध भिडणार आहे. या सामन्यातही बुमराहकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. (former cricketer aaron finch gave funny reply on how to tackle jasprit bumrah)
हेही वाचा-
‘आमची चांगलीच धुलाई केली…’, ‘हिटमॅन’च्या खेळीचं पाकिस्तानी दिग्गजाकडून कौतुक
गुरबाज बनला विक्रमवीर! वर्ल्डकपममध्ये इंग्लंडविरुद्ध केला ‘असा’ Record, लंकेच्या दिग्गजाचा विक्रम तुटला