आशिया चषक 2023 स्पर्धेतील सर्वात मोठा शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुणावर समाधान मानावे लागले. खरं तर, सामना रद्द झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संघांचे खेळाडू एकमेकांसोबत चेष्टा-मस्करी करताना दिसले. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, बाबर आझम, हॅरिस रौफ आणि शादाब खान यांसारखे खेळाडू होते. हे पाहून भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर भडकला. यावेळी त्याने दोन्ही संघांच्या खेळाडूंना सल्ला दिला.
काय म्हणाला गंभीर?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला, “मैत्री बाहेर ठेवली पाहिजे. भारतीय संघ 140 कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांनी स्टेडिअममध्ये मैत्रीसारखे प्रदर्शन केले नाही पाहिजे. अशा भावना आणि मैत्रीसारख्या गोष्टी मैदानाबाहेर असले पाहिजे.”
पुढे बोलताना गंभीर म्हणाला, “जेव्हा तुम्ही राष्ट्रीय संघासाठी मैदानावर खेळता, तेव्हा तुम्ही मैत्री मैदानाबाहेर ठेवली पाहिजे. गेम फेस असणे गरजेचे आहे. मैत्री बाहेर ठेवली पाहिजे. दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या डोळ्यात मैदानावर आक्रमकता असली पाहिजे. त्या 6-7 तासांच्या क्रिकेटनंतर तुम्ही हवे तितके एकमेकांशी गप्पा मारू शकता. मात्र, हे तास महत्त्वाचे आहेत. कारण, तुम्ही फक्त स्वत:चे प्रतिनिधित्व करत नाहीत, तर तुम्ही एक अब्जपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहात.”
“अलीकडे तुम्ही प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंना एकमेकांची पाठ थोपटताना आणि एकमेकांना पाहून विचारपूस करताना पाहत आहात. मात्र, काही वर्षांपूर्वी असे कधीच पाहिले नसेल. तुम्ही मैत्रीपूर्ण सामना खेळत नाहीयेत. जोपर्यंत तुम्ही मैदानावर आहात, तोपर्यंत तुम्हाला एकमेकांविरुद्ध आक्रमक व्हावे लागेल,” असेही गंभीर म्हणाला.
गंभीरने याव्यतिरिक्त क्रिकेटमध्ये स्लेजिंग करण्याबाबतही भाष्य केले. तो म्हणाला, “खेळाडूंमध्ये स्लेजिंग ठीक आहे. त्यांनी हे कधीच वैयक्तिकरीत्या घेतले नाही पाहिजे. तुम्ही वैयक्तिक बनले नाही पाहिजे. तुम्हाला सीमेच्या आत राहावे लागेल. कोणाच्याही कुटुंबाच्या सदस्याला सामील करू नका किंवा खूप जास्त वैयक्तिक बनू नका. मजा-मस्ती ठीक आहे, स्लेजिंग ठीक आहे.”
सामन्यात काय घडलं?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 266 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून हार्दिक पंड्या (87) आणि ईशान किशन (82) यांच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे भारताला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले होते.
यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदी चांगलाच चमकला. त्याने भारताविरुद्ध 10 षटके गोलंदाजी करताना 35 धावा खर्चत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त नसीम शाह आणि हॅरिस रौफ या दोघांनीही प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या होत्या. (former cricketer gautam gambhir angry after seeing india pak players friendly attitude during match said this)
हेही वाचा-
मराठीत माहिती- क्रिकेटर मोहम्मद शमी
फक्त खेळ बदलला! भारताकडून पाकिस्तानचा दारून पराभव
वर्ल्डकप 2023 मधून राहुलचा पत्ता कट? ईशानच्या पकिस्तानविरुद्धच्या दमदार खेळीमुळे क्रिकेट विश्वात चर्चा