इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४३वा सामना शनिवारी (३० एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात संघाने ६ विकेट्सने सामना खिशात घातला. गुजरातचा हंगामातील हा आठवा विजय होता. या विजयाचे शिल्पकार डेविड मिलर आणि राहुल तेवतिया ठरले. तेवतियाला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) खेळाडूंनी चुकीचा सिद्ध केला. यावेळी बेंगलोरने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७० धावा चोपल्या होत्या. बेंगलोरचे १७१ धावांचे आव्हान गुजरातने ४ विकेट्स गमावत १९.३ षटकात पूर्ण केले.
Match 43. Gujarat Titans Won by 6 Wicket(s) https://t.co/GbIT9UdxBs #GTvRCB #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2022
गुजरातकडून फलंदाजी करताना डेविड मिलर (David Miller) आणि राहुल तेवतिया (Rahul Tewatia) यांनी शानदार फलंदाजी केली. मिलरने २४ चेडूंचा सामना करत ३९ धावा केल्या, तर तेवतियाने २५ चेंडूत ४३ धावा चोपल्या. विशेष म्हणजे, राहुल तेवतियाने नेहमीप्रमाणे सामन्याचा शेवट केला. त्याने चौकार मारत संघाला ६ विकेट्सने सामना जिंकून दिला. या दोघांव्यतिरिक्त युवा फलंदाज शुबमन गिलने ३१ धावांचे योगदान दिले. तसेच, वृद्धिमान साहाने २९ आणि साई सुदर्शनने २० धावा चोपल्या.
Ek sher toh beejo sava sher 😍#SeasonOfFirsts #AavaDe #GTvRCB pic.twitter.com/VZ5CzVNIsD
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 30, 2022
यावेळी बेंगलोरकडून शाहबाज अहमद आणि वनिंदू हसरंगा या दोन गोलंदाजांनीच सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शाहबाजने ३ षटके गोलंदाजी करताना २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या, तर हसरंगाने ४ षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत २ विकेट्स आपल्या नावावर केल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरकडून विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक धावा केल्या. हंगामात ९ सामन्यांपासून शांत असलेल्या विराटची बॅट या सामन्यात तळपली. त्याने या सामन्यात ५३ चेंडूत ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ६ चौकारही लगावले. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदार यानेही अर्धशतकी खेळी केली. त्याने ३२ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त फक्त ग्लेन मॅक्सवेलला ३३ धावा करता आल्या. इतर कोणालाही २० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. विशेष म्हणजे, विराट आणि रजतचे अर्धशतकाचा संघाला काही फायदा झाला नाही. त्यांना गुजरातविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना प्रदीप सांगवानने चांगली कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना १९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
या विजयासह गुजरात संघाने पुन्हा एकदा गुणतालिकेत टॉप केला. राजस्थानने ९ सामन्यांपैकी ८ सामन्यात विजय आणि १ सामन्यात पराभव पत्करत आतापर्यंत १६ गुण मिळवले आहेत. दुसरीकडे बेंगलोर संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार अंतिम सामना
रोहित शर्मा – एक धडाकेबाज ओपनर, एक उत्कृष्ट कर्णधार
कृणाल पंड्याची मागील ७ महिन्यांतील मेहनत आली फळाला, दमदार गोलंदाजीचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला