भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जूनमध्ये टी20 विश्वचषक विजेतेपद जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून या दोन दिग्गज फलंदाजांच्या कारकिर्दीची चर्चा रंगली आहे. आता संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही याबाबत आपले मत मांडले आहे. कोहली त्याच्या फिटनेसमुळे पुढील पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो, तर रोहित पुढील वर्षभर आरामात खेळत राहू शकतो, असा विश्वास हरभजनला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 हून अधिक बळी घेणारा हरभजन म्हणाला, “रोहित आणखी दोन वर्षे सहज खेळू शकतो. विराट कोहलीच्या फिटनेसची तुलना तुम्ही इतर कोणाशीही करू शकत नाही. त्याला पाच वर्षे खेळताना तुम्ही सहज पाहू शकता. तुम्ही कोणत्याही 19 वर्षांच्या तरुणाला फिटनेसच्या बाबतीत विराटशी स्पर्धा करायला सांगू शकता. विराट त्याला हरवू शकतो. तो तितका फिट आहे. मला विश्वास आहे की, विराट आणि रोहित यांच्यात अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे. त्यांनी किती दिवस खेळायचे आहे हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. ते दोघेही तंदुरुस्त राहून आपल्या कामगिरीने संघाच्या विजयात हातभार लावत असतील, तर त्यांनी खेळत रहावे.”
हरभजनला असा विश्वास आहे की, कसोटी क्रिकेट हा एक असा प्रकार आहे जिथे संघाला या दोघांची गरज भासेल. तो म्हणाला, “तुम्हाला या दोन खेळाडूंची कसोटी क्रिकेटमध्ये खरोखर गरज आहे. मर्यादित षटकांचे क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेट असो, सर्व फॉरमॅटमध्ये तुम्हाला अनुभव आवश्यक आहे.”
यावेळी हरभजनने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील 0-2 अशा पराभवाला फारसे महत्त्व दिले नाही आणि म्हणाला, “तुम्ही काही सामने जिंकले आणि काही हरले. हा खेळ आहे. प्रत्येक संघाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचे श्रेय मला श्रीलंकेला द्यायचे आहे, ते भारतापेक्षा चांगले खेळले.” भारतीय संघाने टी20 मालिका जिंकल्यानंतर वनडे मालिकेत सपशेल पराभव स्वीकारला होता.