टी-20 वर्ल्डकपच्या उंबरठ्यावर टीम इंडियाच्या तंबूत चिंता वाढताना दिसत आहेत. स्पर्धेपूर्वी तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून सावरत संघात परतले असताना, हर्षित राणाच्या दुखापतीने मात्र भारतीय संघाला पहिलाच मोठा धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात गोलंदाजी करताना हर्षितच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे त्याचं विश्वचषक खेळण्याचं स्वप्न अधुरंच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हर्षित राणा स्पर्धेतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी क्रीडावर्तुळात त्याच्या अनुपस्थितीची चर्चा जोरात सुरू आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत “हर्षित अजून स्पर्धेबाहेर गेलेला नाही” असं स्पष्ट केलं असलं, तरी त्याची फिटनेस स्थिती चिंताजनक असल्याचं त्याने मान्य केलं. त्यामुळे चाहत्यांनी हर्षित या स्पर्धेला मुकणार, हे जवळपास गृहीत धरलं आहे.
दरम्यान, हर्षितच्या जागी कोण? हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला संघात समाविष्ट केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे, सिराज तब्बल दीड वर्षांनंतर टी-20 संघात पुनरागमन करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने शेवटचा टी-20 सामना जुलै 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता, मात्र कसोटी आणि वनडेमध्ये तो सातत्याने खेळत आहे.
मोहम्मद सिराजने भारतासाठी आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळून 14 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेटही 8 पेक्षा कमी आहे. अनुभव, नियंत्रण आणि वेग यामुळे तो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र संघातील आधीच मजबूत वेगवान गोलंदाजी आक्रमण पाहता, सिराजला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का, हा प्रश्न कायम आहे. हार्दिक पांड्याची जागा जवळपास निश्चित असून, जसप्रीत बुमराह सर्व सामने खेळणार हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत सिराजला अंतिम 11 मध्ये स्थान मिळवणं अवघडच दिसत आहे.






