नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची गणना सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. त्याला बाद करणे कोणत्याही गोलंदाजासाठी महत्त्वाची कामगिरी मानली जाते. आपल्या फलंदाजीने त्याने अनेक शानदार विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यामुळे गोलंदाज त्याला गोलंदाजी करताना चिंतेत पडतात.
असे असले तरीही एक काळ असा होता की जेव्हा आयपीएलमध्ये विराटला (Virat Kohli) एका ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने खूप त्रास दिला होता. त्याला समजत नव्हते की, काय केले पाहिजे. तो गोलंदाज इतर कोणी नसून दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्न (Shane Warne) होता.
वॉर्नने दिलेल्या सल्ल्याकडे विराटने केले दुर्लक्ष-
विराट २००९मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळत होता. तर वॉर्न राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा कर्णधार होता. विराटने भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीबरोबर (Sunil Chhetri) लाईव्ह चॅट करताना सांंगितले की, त्याला वॉर्नसमोर खेळणे खूप कठीण जात होते.
तो म्हणाला की, “आयपीएल (IPL) २००९ दरम्यान मी वॉर्नसमोर मूर्ख (fool) ठरलो होतो. तरी यानंतर मी २०११मध्ये त्याच्याविरुद्ध सामना खेळलो तेव्हा तिथे काही खास झाले नाही. त्याने मला बाद केले नाही आणि मीदेखील त्याच्याविरुद्ध अधिक धावा केल्या नाहीत. सामन्यानंतर वॉर्न माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, गोलंदाजाच्या पाठीमागे कधीच काही बोलू नको. परंतु मी यावर हसलो होतो आणि त्याचे म्हणणे ऐकले नव्हते.”
खेळात सुधारणा करण्यासाठी फीटनेसवर दिले लक्ष –
फीटनेसबद्दल स्वत:मध्ये झालेले बदलांबद्दल सांगताना विराट म्हणाला की, याचे श्रेय तो स्वत:ला देणार नाही. तो म्हणाला की, “फीटनेस आणि प्रशिक्षण माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी याचे श्रेय स्वत:ला देणार नाही. माझ्या कारकीर्दीला पुढे घेऊन जाण्याचे श्रेय शंकर बासू (Shankar Basu) यांना जाते.”
“बासू रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये एक प्रशिक्षक होते. त्यांंनी मला वजन उचलण्यास सांगितले होते. त्यावेळी मला त्यामध्ये समस्या येत होती, कारण मला पाठीचा त्रास होता. हे माझ्यासाठी अगदी नवीन होते. परंंतु मला ३ आठवड्यांमध्ये जो परिणाम मिळाला तो आश्चर्यचकीत करणारा होता,” असेही तो पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हाॅस्पिटलमध्ये कोरोनाशी लढतोय फॅन, अचानक या खेळाडूने केला फोन
-कामगारांसाठी रस्त्यावर उतरला हा क्रिकेटर, भर उन्हात वाटतोय अन्न
-फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची कसोटी ड्रीम ११