बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी धोनीबद्दल मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, २०११ च्या विश्वचषकानंतर निवड समितीला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनी नको होता. त्यावेळी मी बोर्डाचा अध्यक्ष असल्यामुळे आपल्या अधिकारांचा वापर करत त्याचे कर्णधारपद वाचविले होते.
२०११ मध्ये भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वात २८ वर्षांनंतर दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपली मोहोर लावली होती. तरीही, विश्वविजेता बनल्यानंतर २०११-१२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटी मालिकेत ०-४ने पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर लगेच तत्कालीन निवड समितीने पुढील वनडे मालिकेसाठी धोनीला कर्णधारपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला होता.
निवड समितीच्या या निर्णयाला रोखण्यासाठी श्रीनिवासन गोल्फ कोर्सवरून थेट निवड समितीच्या बैठकीत पोहोचले होते.
मी गोल्फ कोर्सवरून थेट बैठकीत पोहोचलो होतो- श्रीनिवासन
बोर्डाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की, “त्या दिवशी सुट्टी होती आणि मी गोल्फ खेळत होतो. मी परत आलो तेव्हा बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी सांगितले की, सर निवडकर्ता धोनीला कर्णधार बनविण्यास नकार देत आहेत. त्यावेळी मी थेट बैठकीत हजर झालो आणि बोर्डाचा अध्यक्ष होण्याच्या नात्याने आपल्या अधिकारांचा वापर करत म्हटले की, धोनीच भारतीय संघाचा कर्णधार बनेल.”
‘मी निवडकर्त्यांना विचारले की आपण धोनीला कसं काय हटवू शकतो’
त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, “भारताने विश्वचषक जिंकला होता. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आम्हाला कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे निवड समितीच्या बैठकीत सामील असलेल्या एका निवडकर्त्याला धोनीला वनडे कर्णधारपदावरून हटवायचे होते.”
“परंतु प्रश्न हा होता की, तुम्ही त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून कसं काय हटवू शकता? कारण त्याने काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाला विश्वविजेता बनवले होते. निवडकर्त्यांनी त्यावेळी हादेखील विचार केला नव्हता की त्याच्या जागी संघाची धुरा कोण सांभाळेल,” असेही ते पुढे म्हणाले.
आधी बोर्डाच्या अध्यक्षांच्या मंजुरीनंतरच संघ निवडला जात होता
बीसीसीआयच्या जुन्या घटनेनुसार, निवड समितीला संघ निवडण्यासाठी बोर्डाच्या अध्यक्षांची मंजुरी घ्यावी लागत होती. तरीही, लोढा समितीची शिफारस अंमलात आणल्यानंतर मुख्य निवडकर्त्याला निवडीच्या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला आहे.
तेव्हा मोहिंदर अमरनाथ यांना निवडकर्ता पॅनेलवरून बटविण्यात आले होते
श्रीनिवासन यांचे हे वक्तव्य २०११ मध्ये धोनीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्याचे जे तर्क लावण्यात आले होते, त्यांची पुष्टी करते. यावरून स्पष्ट होते की, तेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयपीएल फ्रंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्जचे मालक असल्यामुळे श्रीनिवासन यांनी धोनीचे कर्णधारपद वाचविले होते.
त्यावेळीही अशा चर्चा केल्या जात होत्या की, बैठकीनंतर मोहिंदर अमरनाथ यांना निवडकर्ता पॅनेलवरून हटविण्यात आले होते. परंतु ते श्रीकांत यांच्या जागी निवड समितीचे अध्यक्ष बनणार होते. त्यावेळी धोनीला कर्णधारपदावरून हटविण्यासाठी सर्वात पुढे अमरनाथच होते. त्यानंतर संदीप पाटील सीनियर निवडकर्ता समितीचे अध्यक्ष बनले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार, दिल्ली कॅपीटल्सचे टेन्शन वाढले
-सीपीएल २०२०: आजचा ड्रीम ११ संघ – त्रिनबॅगो नाईट रायडर्स व गयाना ऍमेझॉन वॉरियर्स
-निवृत्तीची घोषणा केल्यावर धोनी-रैना ढसाढसा रडले, त्या रात्री त्यांनी….
ट्रेंडिंग लेख-
-सीपीएल २०२०चा थरार आजपासून, जाणून घ्या सीपीएलबद्दल ए टू झेड
-‘या’ ३ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं सुरेश रैनाचे अफेयर, अनुष्कासोबतही होती चर्चा
-आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप: सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१० खेळाडू