भारतीय संघ त्यांच्या आगामी टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात आजपासून (७ फेब्रुवारी) करणार आहे. युएसएविरुद्धचा हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जाणार असून सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या सामन्याआधीच यजमान संघाला झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.
भारताच्या संघातून वॉशिंग्टन सुंदरची जागा अद्यापही निश्चित नाही, त्यात आता बुमराहही आजारी असल्याचे कळते. त्यामुळे भारताकडे पहिल्या सामन्यासाठी अंतिम अकरा निवडण्यासाठी केवळ १३ खेळाडू आहेत. सध्या सुंदर बेंगलोरमध्ये बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये दुखापतीतून सावरत आहे. त्याचा अंतिम अधिकृत फिटनेस रिपोर्ट अजून आलेला नाही.
काही रिपोर्ट्सनुसार, बुमराहला ताप आला असल्याने तो युएसए विरुद्धच्या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धेला नुकतीच सुरूवात होत असल्याने संघ व्यवस्थापक त्याच्या बाबतीत कोणतीही हलगर्जी करू इच्छित नाही. यामुळे त्याला पहिल्या सामन्यातून आराम मिळू शकतो. त्याने सामन्याच्या एक दिवस अगोदर मैदानावर आला असता सरावही केला नाही.
त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाही स्पर्धेतून गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्याजागी मोहम्मद सिराजला संघात घेतले असून त्याला युएसए विरुद्धच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये संधी दिली जाऊ शकते.
या सामन्यात भारताकडून सलामीसाठी ईशान किशन आणि अभिषेक शर्मा येतील. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामान्यात सलामीला फलंदाजी केली होती. ईशानने त्यामध्ये अर्धशतकही केले होते. तसेच त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी२० सामन्यात शतकी खेळी केली होती. संजू सॅमसनचा फलंदाजीतील फॉर्म गायब झाल्याने या मालिकेत दिसले, यामुळे ईशानला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळेल.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६साठी भारताचा संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.






