आजकाल टी20 क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटची क्रेझ कमी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आयसीसीनं कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी विशेष योजना आखली आहे.
एका अहवालानुसार, आयसीसी कसोटी क्रिकेटसाठी 125 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा विचार करत आहे. याद्वारे खेळाडूंचं मानधन दिलं जाईल. यासोबतच संघांचा इतर खर्चही पाहिला जाईल. आयसीसीच्या या प्रयत्नाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पाठिंबा दिला आहे.
‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं कसोटी क्रिकेटसाठी विशेष निधी उभारण्याचा प्रस्ताव दिला, ज्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं या योजनेला पाठिंबा दिला. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, जय शाह सध्या आयसीसीचे अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. आयसीसीनं उभारलेल्या निधीतून कसोटी क्रिकेटपटूंची किमान मॅच फी वाढवली जाईल. यासोबतच परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचाही विचार केला जाणार आहे.
आजकाल भारतासह इतर देशांतील अनेक खेळाडू कसोटीपेक्षा टी20 क्रिकेटला अधिक प्राधान्य देत आहेत. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना मोठी रक्कम मिळते. वेस्ट इंडिजचे बहुतांश खेळाडू कसोटीऐवजी टी20 लीगमध्ये खेळण्यास पसंती देतात. त्यामुळे जगभरात कसोटी क्रिकेटची क्रेझ कमी होत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, आयसीसीनं उभारलेल्या निधीचा भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. ही मंडळं आधीच त्यांच्या खेळाडूंना चांगला पगार देतत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झालं तर, त्यांनाही भारतीय खेळाडूंप्रमाणे चांगले पगार मिळतात. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला गेल्या वर्षी कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार म्हणून सुमारे 25 कोटी रुपये मिळाले होते. तर ऑस्ट्रेलियाकडून नियमित क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना सुमारे 8 ते 16 कोटी रुपये मिळतात.
हेही वाचा –
ऐकावं ते नवलच! स्वत:च्याच मुलाविरुद्ध मैदानावर उतरला दिग्गज क्रिकेटपटू
147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं! आशिया खंडाबाहेर श्रीलंकेच्या गोलंदाजांचा पराक्रम
नीरज चोप्राची मोठी झेप, ब्रॅन्ड व्हॅल्यूच्या बाबतीत हार्दिक पांड्याला मागे टाकलं; आता नंबर रोहितचा!