टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने मोठा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी (1 फेब्रुवारी) रात्री निर्णय घेतला की पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा ग्रुप स्टेज सामना खेळणार नाही. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपली भूमिका स्पष्ट करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताविरुद्ध सामना बहिष्कृत करण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तानवर अनेक कठोर कारवाया होण्याची शक्यता आहे. आयसीसीकडून पाकिस्तानवर थेट बंदी घालण्यासह आर्थिक दंड, द्विपक्षीय मालिकांवर परिणाम आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) वर निर्बंध लादले जाऊ शकतात. विशेष म्हणजे, आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यासोबत असलेल्या करारानुसार भारत-पाकिस्तान सामना तटस्थ स्थळी खेळवण्याचे आधीच ठरले होते. असे असतानाही पीसीबीने कोलंबो येथे होणारा सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याने करारभंग झाल्याचे मानले जात आहे.
आयसीसी बोर्डातील एका सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “पाकिस्तानकडून अधिकृत घोषणा झाल्यास आयसीसीकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. आज सोमवारी होणाऱ्या व्हर्च्युअल बोर्ड बैठकीत पाकिस्तानला स्पर्धेत खेळण्याची परवानगी द्यायची की नाही, यावर निर्णय घेतला जाईल.” जर पाकिस्तानला खेळण्याची मुभा दिली, तरी पीसीबीवर मोठ्या शिक्षांचा बडगा उगारला जाऊ शकतो.
भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सामना बहिष्कारामुळे संभाव्य परिणाम 5 मुद्द्यांत:
स्पर्धेतून बंदी- पाकिस्तानला संपूर्ण टी20 वर्ल्ड कप 2026 मधून हटवण्याची शक्यता.
आर्थिक दंड- आयसीसीकडून पीसीबीवर मोठा आर्थिक दंड लादला जाऊ शकतो.
पीएसएलवर निर्बंध- विद्यमान विदेशी खेळाडूंना (फ्री एजंट्स वगळता) पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यास मनाई होऊ शकते.
द्विपक्षीय मालिका व रँकिंगवर परिणाम- पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास अन्य सदस्य देश नकार देऊ शकतात, WTC गुण आणि आयसीसी रँकिंगवर परिणाम होऊ शकतो.
जाहिरात महसूलाची भरपाई- भारत-पाकिस्तान सामन्यामुळे होणाऱ्या जिओ-स्टारसारख्या प्रसारणकर्त्यांच्या महसुलाचा नुकसान पीसीबीला भरून काढावा लागू शकतो.
याशिवाय, आयसीसीच्या अधिकृत प्रसारणकर्त्या जिओ-स्टारला होणाऱ्या जाहिरात महसुलाच्या नुकसानीची भरपाईही पीसीबीला करावी लागू शकते. भारत-पाकिस्तान टी20 सामन्यातून साधारणपणे 200 कोटी रुपयांहून अधिक जाहिरात महसूल मिळतो. पाकिस्तानने सामना न खेळल्यास हा संपूर्ण तोटा होऊ शकतो.
जर पाकिस्तानवर स्पर्धेतून बंदी घालण्यात आली, तर त्यांच्या जागी युगांडाला संधी मिळू शकते. आता आयसीसीच्या बैठकीनंतर पीसीबीच्या भवितव्यावर नेमका काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.






