आपण बऱ्याचदा असं ऐकलं आहे की परीक्षेचा चांगला अभ्यास व्हावा किंवा अभ्यासात सातत्य राहावं आणि त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून विध्यार्थी बऱ्याचदा सोशल मीडिया अप्लिकेशनपासून दूर राहतात. मात्र ऑस्ट्रेलियाच्या एका युवा क्रिकेटपटूने खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाला पोहचला आहे. दोन्ही संघांचे खेळाडू कसून सराव करत आहेत. 27 नोव्हेंबरला वनडे सामन्यांच्या मालिकेने या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होईल. या मालिकेआधी विल पुकोव्हस्कीने सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
पुकोव्हस्कीची आहे जोरदार चर्चा
गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शिल्ड या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या पुकोव्हस्कीची जोरदार चर्चा आहे. मागील काही वर्षात खूप कमी युवा क्रिकेटपटूंची इतकी चर्चा झाली आहे. आपले लक्ष विचलित होऊ नये म्हणून पुकोव्हस्कीने सोशल मीडियाचा वापर करणे पूर्णपणे टाळले आहे.
….म्हणून सोशल मीडियापासून स्वतःला केले दूर
त्याच्या निर्णयाबद्दल बोलताना पुकोव्हस्की म्हणाला की, “माझ्या या निर्णयाबद्दल माध्यमांमध्ये बरीच चर्चा आहे. मला माझ्या तयारीवर व खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं आहे. या कारणास्तव मी ट्विटर आणि अन्य सोशल मीडियापासून स्वत: ला दूर केले आहे. त्यामुळे मी माझे कार्य सुलभतेने करू शकेल.”
शेफील्ड शिल्डमध्ये ठोकली दोन दुहेरी शतके
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 17 सदस्यीय कसोटी संघात पुकोव्हस्की आणि कॅमेरून ग्रीनसह पाच नवीन खेळाडूंचा समावेश आहे. शेफल्ड शिल्ड या देशांतर्गत स्पर्धेत नुकतेच पुकोव्हस्कीने सलग दोन सामन्यात दुहेरी शतके ठोकली. शाळेच्या काळात, त्याला फुटबॉल खेळत असताना डोक्याला दुखापत झाली होती, परंतु कठोर परिश्रम घेत त्याने सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळवले आहे.
मानसिक आरोग्याशी केला संघर्ष
कारकिर्दीच्या सुरुवातीस पुकोव्हस्कीने मानसिक आरोग्याशीही संघर्ष केला. यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पणदेखील लांबणीवर पडले. मागील वर्षी श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलिया संघात त्याची निवड निश्चित होती, पण त्यावेळी त्याने माघार घेतली होती.
मधल्या फळीत करेल फलंदाजी
नुकतेच ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगरने पुकोव्हस्कीची स्तुती करताना सांगितले की, “तो एक महान फलंदाज आहे. तथापि, डेविड वॉर्नरचा सलामीचा जोडीदार म्हणून पुकोव्हस्की आणि जो बर्न्स यांच्यात शर्यत असेल. बर्न्स आणि वॉर्नरची जोडी या संघाला आवडते. यावेळी असे म्हटले जाऊ शकते की केवळ ही जोडी सलामीला खेळेल. अशा परिस्थितीत पुकोव्हस्कीला मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळू शकते.”