भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धरमशाला येथे सुरू आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 477 धावांवर ऑलआऊट झाली. आज टीम इंडियाला दुसऱ्या दिवसाच्या खेळात फक्त 4 धावांची भर घालता आली. तत्पूर्वी, इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 218 धावांत सर्वबाद झाला होता. पहिल्या डावात भारतीय संघाला 259 धावांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवशी (८ मार्च) खेळ संपेपर्यंत भारतानं पहिल्या डावात 8 गडी बाद 473 धावा केल्या होत्या.
भारताची पहिली विकेट यशस्वी जयस्वालच्या रूपानं पडली. तो 58 चेंडूत 57 धावा करून शोएब बशीरच्या गोलंदाजीत बाद झाला. कर्णधार रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधील 12वं शतक झळकावलं. रोहितनं 154 चेंडूत शतक साजरं केलं. रोहित पाठोपाठ शुबमन गिलनंही 137 चेंडूत चौथं कसोटी शतक पूर्ण केलं. मात्र, उपाहारानंतर टीम इंडियाला सलग दोन धक्के बसले. पहिले इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं रोहित शर्माला क्लीन बोल्ड केलं. स्कोअरबोर्डमध्ये आणखी 4 धावांची भर पडल्यानंतर शुबमन गिललाही जेम्स अँडरसननं बोल्ड केलं.
येथून सरफराज खान आणि पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडिक्कल यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली. दोन्ही खेळाडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी झाली. पडिक्कलनं 103 चेंडूत 65 आणि सरफराज खाननं 60 चेंडूत 56 धावा केल्या. येथून मात्र भारतानं ठराविक अंतरानं विकेट गमावल्या. एका क्षणी भारताची धावसंख्या 8 विकेट्सवर 428 धावा होती. तेव्हा भारतीय संघ 450 धावांच्या आतच मर्यादित राहील असं वाटत होतं. मात्र जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी दुसऱ्या दिवशी भारताचं आणखी नुकसान होऊ दिलं नाही.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर कुलदीप आणि बुमराह अर्ध्या तासातच तंबूत परतले. कुलदीपनं 69 चेंडूत 30 आणि बुमराहनं 64 चेंडूत 20 धावा नोंदवल्या. इंग्लंडकडून शोयब बशीरनं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर टॉम हार्टले आणि जेम्स अँडरसननं 2-2 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
शेरास सव्वाशेर! इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ला यशस्वीच्या ‘जॅसबॉल’ने उत्तर
टीम इंडियानं इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं, देवदत्त पडिक्कलचं पदार्पणातच अर्धशतक
धरमशालेच्या थंडीत सरफराजनं फोडला इंग्लिश गोलंदाजांना घाम! झळकावलं झंझावाती अर्धशतक