भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज, शनिवार 31 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून अजेय आघाडी घेतली होती. मात्र, चौथ्या टी20 सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.
मागील सामन्यात भारतीय संघाने सहा गोलंदाजांचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयोग संघाला महागात पडला. आता टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा अखेरचा सामना महत्त्वाचा असल्याने आजच्या लढतीत भारतीय संघात काही मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ईशान किशन आणि अक्षर पटेल यांना पुन्हा संधी मिळू शकते.
ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमची पिच आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या चार पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मिश्र स्वरूपाची राहिली आहे. भारताने येथे खेळलेले शेवटचे दोन टी20 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभारून ती यशस्वीपणे डिफेंड केली होती, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्याला अवघ्या 106 धावांत गुंडाळत दणदणीत विजय मिळवला होता.
या मालिकेत देशभरातील मैदानांवर फलंदाजांना अनुकूल अशा सपाट पिच पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे तिरुवनंतपुरममध्येही तशीच पिच मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने अंतिम टी20 सामन्यासाठी सपाट पिच आणि छोट्या मैदानाची अपेक्षा व्यक्त केली आहे. या सामन्यासाठी सेंटर पिच तयार करण्यात आली असून, येथे धावसंख्या मोठी राहण्याची शक्यता आहे. मागील वेळी भारताने या मैदानावर 235 धावा केल्या होत्या.
या मैदानावर आतापर्यंत 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले असून, त्यापैकी 3 सामने यजमान संघाने जिंकले आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आणि धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांना समान यश मिळाले आहे. येथील सर्वोच्च धावसंख्या 235/4 अशी आहे.






