श्रीलंकेविरुद्धच्या (IND VS SL T-20 Series) पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले आणि ६२ धावा राखून विजय मिळवला. लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ईशान किशन (Ishan Kishan) याने अप्रतिम प्रदर्शन केले आणि विजयामध्ये मोलाचे योगदान दिले. वेस्ट इंडिजविरुद्ध खराब प्रदर्शन करणाऱ्या ईशानसाठी ही खेली महत्वाची ठरणार आहे. सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) खुलासा केला की, त्याने खेळपट्टीवर असताना ईशानला एक महत्वाचा सल्ला दिला होता.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन डावाची सुरुवात करण्यासाठी आले होते. दोघांनी संघाला चांगली सुरुवात दिली आणि पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. ईशानने या सामन्यात ५६ चेंडूत सर्वाधिक ८९ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मा ४४ धावा करून बाद झाला आणि नंतर श्रेयसने त्याला चांगली साथ दिली.
सामना संपल्यानंतर श्रेयसने सांगितले की, “मी जेव्हा फलंदाजी करायला उतरलो, तेव्हा माझा उद्देश स्वतःचे शॉट खेळणे होते. याच ध्येयासह मी खेळपट्टीवर आलो होतो. ईशान किशनला मधल्या षटकांमध्ये चेंडूला व्यवस्थित वेळेनुसार हिट करता येत नव्हते. मी पाहिले की, तो स्वतःचे धैर्य गमावत होता. मी तेव्हा त्याला फक्त एवढेच सांगितले की, त्याने स्वतःचा वेळ घ्यावा आणि संधी मिळताच २-३ धावा घ्याव्यात. आमची रणनिती बोर्डवर मोठी धावसंख्या लावण्याची होती. सुरुवातीला आम्ही असेच केले आणि सर्व गोष्टी आमच्यासाठी खूप चांगल्या राहिल्या. मी जास्त विचार करत नव्हतो, मला वाटले की १८० धावसंख्या चांगली आहे. मला चेंडू पाहून खेळायचा होता आणि मी माझे शॉट खेळत राहिलो,” असे श्रेयसने पुढे बोलताना सांगितले.
विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, केएल राहुल या खेळाडूंच्या अनुपस्थित भारताच्या फलंदाजी क्रमवारीत मोठा फेरबदल पाहायला मिळाला. ईशान किशन सलामीसाठी आला, तर श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. रवींद्र जडेजा नेहमीप्रमाणे फिनिशरच्या भूमिकेत दिसला. मात्र, या सामन्यात तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.
सामन्याची खेळाडूंच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ईशान किशननंतर श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा यांनी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या. तसेच श्रेयसने पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या जडेजाला चार चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि त्यामध्यो तो तीन धावा करू शकला. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि वेंकटेश अय्यरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy: तमिळनाडूसाठी जुळ्या भावांचा एकत्रच शतकी दणका, तर दिग्गजांकडून निराशा
‘या’ राज्यात सुरू होतेय देशातील पहिलीच महिला क्रिकेट अकादमी, विनाशुल्क पुरवल्या जातील सुविधा