बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात खेळला गेलेला वनडे सामना भारताने जिंकला. गुरुवारी (दि. 27 जुलै) पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 5 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. या सामन्यात सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा 7व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. सामना जिंकल्यानंतर सातव्या क्रमांकावर खेळण्याविषयी रोहितने भाष्य केले.
काय म्हणाला रोहित?
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा सामन्यात सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरला होता. त्याविषयी बोलताना रोहितने म्हटले की, यामुळे त्याच्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाण्याची संधी मिळाली, जेव्हा तो नवीन खेळाडू म्हणून या क्रमांकावर फलंदाजी करायचा. रोहित म्हणाला की, “मी भारतीय संघासाठी पदार्पण केले आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो. मला त्या दिवसांची आठवण आली.”
फलंदाजी फळीत बदल करण्याविषयी रोहित म्हणाला की, “सूर्यकुमार यादव यासारख्या मर्यादित षटकांच्या विशेषज्ञांना खेळण्याची संधी देण्याचे हे पाऊल होते. आम्हाला वनडेसाठी आलेल्या नवीन खेळाडूंना वेळ द्यायचा होता. जेव्हाही शक्य होईल, तेव्हा आम्ही या गोष्टी आजमावत राहू. त्यांना 115 धावांपर्यंत रोखल्यानंतर आम्हाला माहिती होते की, आम्ही या खेळाडूंना आजमावू शकतो आणि त्यांना संधी देऊ शकतो.”
सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर, तर हार्दिक पंड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरले होते. त्यांचा बचाव करत रोहित म्हणाला की, “मला वाटत नाही की, त्यांना अशाप्रकारच्या अनेक संधी मिळतील.” यावेळी रोहितने प्रभावित करणाऱ्या वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचेही कौतुक केले.
रोहित म्हणाला की, “मुकेश शानदार गोलंदाज आहे. तो चेंडू चांगल्याप्रकारे स्विंग करतो. मी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला जास्त पाहिले नाहीये. परिस्थिती कशीही असो, आम्हाला त्यांना रोखण्यासाठी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याची गरज आहे. मला वाटले की, आमच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. त्यानंतर ईशानने बॅटमधून चांगली कामगिरी केली.”
रोहित शर्माची खेळी
सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रोहित शर्मा याने सामन्यात 19 चेंडूंचा सामना केला. यावेळी त्याने 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 12 धावा चोपल्या. भारताकडून या सामन्यात ईशान किशन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. (ind vs wi why skipper rohit sharma played at number seven in first odi know here)
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीज कर्णधारालाही समजली टीम इंडियाच्या बॉलर्सची ताकद; पराभवानंतर म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांनी…’
पहिल्याच वनडेत जडेजा-कुलदीप जोडीने घडवला इतिहास, बनली ‘असा’ पराक्रम करणारी पहिली भारतीय स्पिन जोडी