टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने सेमीफायनलच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, सुपर-8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर तब्बल 72 धावांनी दणदणीत विजय मिळवला. चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बहुतांश भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मात्र शिवम दुबेसाठी हा सामना विसरण्यासारखाच ठरला.
दुबेला फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र गोलंदाजी करताना त्याने चाहत्यांची आणि संघ व्यवस्थापनाची मोठी निराशा केली. अवघ्या 2 ओव्हर्समध्ये त्याने 46 धावा दिल्या. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी त्याच्यावर अक्षरशः हल्लाबोल करत चौफेर फटकेबाजी केली. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्याच दोन ओव्हर्समध्ये 46 धावा देण्याची ही पहिलीच वेळ ठरली आणि हा नकोसा विक्रम दुबेच्या नावावर जमा झाला.
इतकंच नव्हे, तर त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 5 नो-बॉल टाकले आहेत. एका टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत एखाद्या गोलंदाजाने इतके नो-बॉल टाकण्याची ही पहिलीच घटना आहे. एकूणच भारताने या स्पर्धेत 7 नो-बॉल टाकले असून, वर्ल्ड कप इतिहासात एका संघाकडून इतके नो-बॉल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धही दुबेची कामगिरी विशेष ठरली नव्हती. त्या सामन्यात त्याने 2 ओव्हर्समध्ये 32 धावा देत एक विकेट घेतली होती. त्याच्या महागड्या स्पेलमुळे प्रतिस्पर्धी संघाला मोठा स्कोअर उभारता आला होता.
भारतासाठी पुढील प्रत्येक सामना ‘करो या मरो’ असणार आहे. सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर गोलंदाजीतील अशा चुका परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये शिवम दुबेला चेंडू देताना कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने अधिक सावध भूमिका घ्यावी लागेल, हे मात्र नक्की.






