---Advertisement---

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया खेळणार सराव सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामना

---Advertisement---

भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ४ ऑगस्टपासून भारताला यजमान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. नॉटिंगघम येथे या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाला तीन दिवसीय सराव सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. याबद्दल डरहॅम क्रिकेटने बुधवारी(१४ जुलै) घोषणा केली आहे.

इंग्लंड दौऱ्यात ही कसोटी मालिका खेळण्यापूर्वी भारतीय संघाने कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. या अंतिम सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यापूर्वी भारताने सराव सामना न खेळता आपापसातच सामना खेळत सराव केला होता.  त्यामुळे कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर सामन्यापूर्वी सराव सामना न खेळण्याने बरीच टीका झाली होती.

त्यामुळे या गोष्टीतून धडा घेत बीसीसीआयने इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना आयोजित करण्याची मागणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे केली होती. अखेर भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी काऊंटी चॅम्पियनशीप एकादश संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.

हा सराव सामना २० ते २२ जुलै दरम्यान डरहॅमच्या एमिरेट्स रिव्हरसाईड मैदानात होईल. या सामन्याला स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरुवात होणार आहे. तसेच प्रत्येक दिवशी प्रत्येकी ९० षटकांचा खेळ होणार आहे. या सराव सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण डरहॅम क्रिकेटच्या युट्यूब चॅनेलवर होणार आहे.

भारतीय खेळाडूंना देण्यात आली होती सुट्टी 
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना तीन आठवड्यांची सुटी देण्यात आली होती. ज्यामुळे खेळाडू ताजेतवाणे होऊन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होतील. ही सुटी संपल्यानंतर आता भारतीय खेळाडू डरहॅम येथे एकत्र येतील. तिथे भारतीय संघाचे सराव शिबिर डरहॅम होईल. हे शिबिर पूर्ण करुन आणि सराव सामना खेळल्यानंतर भारतीय संघ पहिला सामना खेळण्यासाठी नॉटिंगघमला जाईल.

कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेला सुरुवात
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी अगामी कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण ही मालिका कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे या मालिकेतून अधिकाधिक गुण मिळवून स्पर्धेची सुरुवात दमदार करण्याची दोन्ही संघांना संधी असणार आहे.

असे आहे इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर

असा आहे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला

महत्त्वाच्या बातम्या –

लाईट्स,कॅमेरा,ऍक्शन! श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या ‘यंगिस्तान’च्या फोटोशूटची पाहा खास झलक

मुंबईतील फार्मर्स कॅफेबाहेर स्पॉट झाला मास्टर ब्लास्टरचा मुलगा; पॅपराजींनी टिपले फोटो

ऐकलंत का! श्रीलंकन प्रशिक्षकाचे टीम इंडियाबाबत मोठे वक्तव्य; म्हणतायत, ‘भारत आपल्या सर्वोत्तम आयपीएल…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---