भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीला आयसीसीच्या पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता भारतीय संघ या दौऱ्यात ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होईल.
या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची जोरदार तयारी चालू आहे. परंतु, भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांचे वय पाहता हा इंग्लंडचा दौरा त्यांच्यासाठी अंतिम दौरा असू शकतो. इंग्लंड दौऱ्यातील भारताच्या २१ सदस्यीय संघात असे ३ खेळाडू आहेत. ज्यांच्यासाठी हा दौरा शेवटचा असू शकतो, अशा खेळाडूंचा या लेखात आढावा घेऊ.
१) ईशांत शर्मा –
ईशांत शर्मा भारताचा वेगवान गोलंदाज आहे. गेल्या १४ वर्षांपासून इशांत शर्मा भारतीय संघासाठी खेळत आहे, म्हणून त्याच्याकडे भारताचा एक अनुभवी गोलंदाज म्हणून देखील पाहिले जाते. इशांतने आतापर्यंत एकूण १०२ कसोटी सामने खेळले असून, त्यात त्याने ३०६ बळी घेतले आहेत. ईशांतची गेल्या काही वर्षातील कामगिरी आणि अनुभव पाहता, तो इंग्लंड दौऱ्यावर महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. इंग्लंडसारख्या खेळपट्टीचा देखील इशांतला चांगलाच अनुभव आहे. मात्र असे असले तरी इशांतचे वय आता ३३ च्या आसपास आहे, तसेच त्याला होणाऱ्या सततच्या दुखापती पाहाता ईशांतसाठी हा इंग्लंडचा दौरा अंतिम असण्याची शक्यता आहे.
२) मोहम्मद शमी –
शमी भारतीय संघासाठी गेल्या अनेक वर्षांपासून खेळत आहे. आपल्या वेगाच्या जोरावर या गोलंदाजाने अनेक वेळा गरजेच्या वेळी भारतीय संघासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. शमी देखील भारतातील एक अनुभवी गोलंदाज आहे आणि शमीने गेल्या काही काळापासून भारतासाठी अव्वल दर्जाची गोलंदाजी केली आहे. परंतु, शमीचे वय आणि फिटनेस पाहता त्याच्यासाठीसुद्धा हा इंग्लंडचा अंतिम दौरा ठरू शकतो.
३) रोहित शर्मा –
या यादीत रोहित शर्माचे देखील नाव आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज आहे. त्याने २०१९ साली दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्यांदा सलामीवीर म्हणून फलंदाजी केली होती आणि यात त्याने चांगली कामगिरी करत एक द्विशतक झळकावले होते. रोहितने कसोटी मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. असे असले तरी रोहितचे वय ३४ च्या पार गेले आहे. त्यामुळे हा दौरा रोहितचा शेवटचा इंग्लंड दौरा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
–जोकोविचच्या संयमाचा फुटला बांध, रागाच्या भरात तोडले रॅकेट; व्हिडिओ होतोय व्हायरल
–टोकियो ऑलिंपिक: भारतीय गोल्फर अनिर्बन लहिरी तिसऱ्या राऊंडनंतर पोहोचला ‘या’ स्थानी