भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मागच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. वनडे विश्वचषक यावर्षी भारतात होत असल्यामुळे या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता पाहायला मिळत आहे. शनिवारी (14 ऑक्टोबर) अखेर दोन्ही संघ अहमदाबादमध्ये आमने सामने असणार आहेत. आपण या लेखात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आमने सामने आकडेवारी पाहणार आहोत.
वनडे विश्वचषक 2023ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये झाली. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या चालू हंगामात सुरुवातीचे प्रत्येकी दोन-दोन सामने खेळले आणि जिंकले आहेत. मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध खेळायचा आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अशी ओळख असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा थरार अनुभवण्यासाठी लाखाभर चाहते मैदानात उपस्थित असतील. भारतासाठी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध आपला विजयरथ न थांबू देण्याचे, तर पाकिस्तानपुढे वनडे विश्वचषकात भारताला पहिल्यांदा पराभूत करण्याचे आव्हान असेल.
हेड-टू-हेड आकडेवारी
विश्वचषकाच्या (वनडे) इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 7 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यापैकी एकही सामना भारताने पाकिस्तानला जिंकू दिला नाहीये. भारताने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या सर्व विश्वचषकांमध्ये पाकिस्तानविरुद्ध एक-एक सामना खेळला आणि सर्वच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला. यादरम्यान 336 ही भारताची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. यावर्षी देखील भारतीय संघ पाकिस्तानला पराभूत करण्याच्या पूर्ण प्रयत्न करेल आणि विजयाची परंपरा पुढे चालू ठेवू शकतो. उभय संघातील एकंदरीत वनडे आकडेवारी पाहिली, तर एकूण 134 सामने भारत आणि पाकिस्तान संघात खेळले गेले आहेत. यातील 54 सामने भारताने, तर 73 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. 5 सामने अनिकाली राहिले. (India vs Pakistan World Cup Head-to-Head Stats)
यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.