सध्या कोरोना व्हायरसचे सावट संपूर्ण जगभर पसरले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. असे असले तरी भारतीय संघ या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ४ कसोटी आणि ३ वनडे मालिका खेळायच्या आहेत.
या दौऱ्यातील कसोटी मालिकेबद्दल (Test Series) बोलताना माजी दिग्गज खेळाडू इयान चॅपेल (Ian Chappell) यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, जर भारतीय संघाने स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नरला (David Warner) लवकर बाद केले नाही तर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकता येणार नाही.
चॅपेल पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरसवर (Corona Virus) नियंत्रण मिळवल्यानंतर ही मालिका झाली तर, स्मिथ आणि वॉर्नरच्या उपस्थितीचा ऑस्ट्रेलियाला फायदा मिळेल.
एका कार्यक्रमात चॅपेल म्हणाले की, “मी या मालिकेची वाट पाहतोय. हे खूप मनोरंजक असेल. भारताने मागील दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते, त्यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला असेल.”
“यावेळी भारतीय संघासमोर कठीण आव्हान असेल. कारण स्मिथ आणि वॉर्नर आता ऑस्ट्रेलिया संघात असणार आहेत. तरीही भारतीय संघ ऑस्ट्रेलियामधील परिस्थितीत खेळण्यासाठी सक्षम आहे,” असेही चॅपेल यावेळी म्हणाले.
भारतीय संघाला सल्ला देत चॅपेल म्हणाले की, “ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात पराभूत करणे कठीण आहे. कारण त्यांच्याकडे चांगल्या गोलंदाजांचा ताफा आहे. भारतीय संघ तेव्हाच विजयी होऊ शकतो, जेव्हा स्मिथ आणि वॉर्नर लवकर बाद होतील.”
चॅपेल यांनी विराटची प्रशंसा करत म्हटले की, “विराट तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वोत्तम आहे.”
भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वात २०१८-१९मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात स्मिथ आणि वॉर्नर नव्हते. कारण त्या दोघांवरही चेंडू छेडछाड प्रकरणामुळे १ वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बहिणीमुळे लहानपणी उजव्या हाताचे बोट कापावे लागले; तरी आज आहे जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज
-कोरोना व्हायरसमुळे सगळ नष्ट झालं, आता चक्क तंबू टाकून राहतोय हा क्रिकेटर






