एकीकडे भारतीय क्रिकेट संघ एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडविरुद्ध दोन हात करत असताना दुसरीकडे दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील संघ टी२०मध्ये आपली ताकद दाखवत आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या ३ टी२० मालिकेपूर्वी सराव सामना खेळत आहे. या भागात रविवारी भारताचा दुसरा सराव सामना नॉर्थम्प्टनशायरशी झाला. छोटी धावसंख्या करूनही भारतीय संघाने हा सामना १० धावांनी जिंकला. भारताच्या विजयात हर्षल पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने प्रथम बॅटने फटकेबाजी केली आणि नंतर चेंडूने अप्रतिम कामगिरी केली. हर्षलने ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली आणि त्यानंतर दोन विकेट्सही घेतल्या. याआधी भारताने डर्बीशायरविरुद्धचा पहिला सराव सामनाही जिंकला होता.
भारताविरुद्धच्या सामन्यात नॉर्थम्प्टनशायरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादवसारखे मोठे फलंदाज अपयशी ठरले. सॅमसन तर पहिल्या चेंडूवर ० धावा करत बाद झाला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याला गोलंदाज कोबने बाद केले. यानंतर राहुल त्रिपाठी आणि सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाले. ८ धावांवर भारताने तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर कर्णधार दिनेश कार्तिकने इशान किशनच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. पण, इशानही ५१ धावांवर बाद झाला. यानंतर कार्तिकही पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताचा निम्मा संघ ७२ धावांवर बाद झाला.
हर्षल पटेलची दुहेरी कामगिरी
यानंतर हर्षल पटेलने फलंदाजी करत आपली ताकद दाखवून दिली. त्याने अवघ्या ३६ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. त्याला दुसऱ्या टोकाकडून व्यंकटेश अय्यरची साथ लाभली. दोघांनी २० षटकांत ८ विकेट गमावून भारताची धावसंख्या १४९ धावांपर्यंत नेली. फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर आता विजयाची सर्व जबाबदारी गोलंदाजांवर आली आणि त्यांनी ती खरी करून दाखवली.
भारतीय गोलंदाजांनीही पहिल्याच षटकात नॉर्थहॅम्प्टनशायरच्या फलंदाजांना हैराण केले आणि ५४ धावांवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतवला. यानंतर नॉर्थम्प्टनशायरच्या संघाने पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न केले. पण, भारतीय गोलंदाजांनी शेवटपर्यंत पेच घट्ट ठेवला आणि १९.३ षटकांत नॉर्थम्प्टनशायरचा संघ १३९ धावांत आटोपला. भारताकडून आवेश खान, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल यांनी २-२ विकेट घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
साहाचं ठरलंय! सध्याच्या संघाला जय महाराष्ट्र म्हणत ‘या’ संघाकडून भविष्यात क्रिकेट खेळणार
VIDEO। इंग्लिश फलंदाजाने ब्रॉडचा बदला घेतलाय, भारतीय गोलंदाजाचा चोपलेत एका षटकात ५ सिक्स
मिचेल स्टार्कने ठेवला भारतीय खेळाडूंपुढे आदर्श, राष्ट्रीय संघासाठी दिली टी-२० लीगची कुर्बानी