Rohit Sharma On Gautam Gambhir :- भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवारपासून (02 ऑगस्ट) श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची कमान सांभाळेल. तर विराट कोहली, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर हे खेळाडूदेखील या मालिकेत खेळताना दिसतील. नवनिर्वाचीत प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासोबत ही रोहितची कर्णधार म्हणून पहिलीच मालिका असेल. त्यामुळे प्रशिक्षक व कर्णधाराची ही नवी जोडी कशी कामगिरी करेल?, यावर सर्वांचे लक्ष असेल. दरम्यान रोहितने प्रशिक्षक गंभीर यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
गंभीरच्या मार्गदर्शनाखाली रोहितच्या संघाला पुढील वर्षी सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह इतर काही जागतिक स्तरीय स्पर्धा खेळायच्या आहेत. गंभीरचा कार्यकाळ 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत आहे.
अशातच भारतीय कर्णधाराने कबूल केले की, गंभीरची प्रशिक्षण शैली यापूर्वीच्या भारतीय प्रशिक्षकांपेक्षा वेगळी असेल. रोहित म्हणाला, “गौतम गंभीरने भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि तो फ्रँचायझी क्रिकेटशी जोडला गेला आहे. पूर्वीच्या सपोर्ट स्टाफपेक्षा तो नक्कीच वेगळा असेल. राहुल द्रविड प्रशिक्षक होण्यापूर्वी रवी शास्त्री होते. प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीने काम करतो. मी गंभीरला खूप दिवसांपासून ओळखतो आणि आम्ही एकत्र थोडे क्रिकेट खेळलो आहे. तो खूप स्पष्ट आहे आणि त्याला संघाकडून काय हवे आहे हे त्याला ठाऊक आहे. आम्ही संघातील उणिवा, चांगल्या गोष्टींबद्दल आणि संघाला आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल बोललो आहोत. संघाला पुढे कसे न्यायचे यावर चर्चा झाली आहे.”
नवीन प्रशिक्षकाबद्दल रोहित पुढे म्हणाला, “गौतम भाई ड्रेसिंग रूममध्ये खूप मजेदार गोष्टी करतात, खूप विनोद सांगतात. मला वाटत नाही की आपण त्याच्या वैयक्तिक व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलू नये, जसे की तो हसतो की नाही? प्रत्येकाची स्वतःची वेगळी शैली असते.”
महत्त्वाच्या बातम्या-
कोल्हापूरकर स्वप्नील कुसाळेसाठी सतेज पाटलांनी पेटारा उघडला, जाहीर केलं मोठं बक्षीस
एकच चर्चा- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या स्वप्निलने कोणती अंगठी घातली होती हातात?
मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जगभर काैतुक, पंतप्रधान मोदींची कांस्य पदक विजेत्यासाठी खास पोस्ट