भारतीय संघ पुढील महिन्यात आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्यावर रवाना होईल. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाला वनडे, टी20 आणि कसोटी अशा तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे या मोठ्या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू आपल्या कुटुंबियांना ऑस्ट्रेलियात घेऊन जाऊ शकतात की नाही याबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पत्नी आणि मुलांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेण्याची मिळाली परवानगी
बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंच्या पत्नी आणि मुलांना ऑस्ट्रेलिया दौर्यावर नेण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी कुटूंबाला सोबत नेण्याची परवानगी दिली जाईल की नाही याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि क्वारंटाईन ठेवण्याच्या नियमांमुळे याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. पण आता खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुटुंबियांसह जाता येणार आहे.
अनौपचारिकरित्या खेळाडूंना दिली परवानगी
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “काही भारतीय खेळाडूंनी आम्हाला कुटुंबातील सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. त्यांच्यातील काही खेळाडू आपल्या पत्नीला यूएई येथे सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत सोबत घेऊन गेले नव्हते. आम्ही अनौपचारिकरित्या खेळाडूंना सांगितले की ते त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाऊ शकतात. त्यांच्या कुटूंबाच्या पासपोर्टचा तपशील घेण्यात आला आहे,”
सिडनीमध्ये 14 दिवस राहावे लागेल क्वारंटाईन
भारतीय संघ आयपीएलनंतर दुबईहून चार्टर विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर खेळाडूंना सिडनीमध्ये 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. त्यांना सात दिवसानंतर प्रशिक्षण घेण्याची आणि सराव करण्याची मुभा दिली जाईल.
परदेशात पहिल्यांदाच खेळणार डे-नाईट कसोटी सामना
भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौर्यावर डे-नाईट कसोटी सामनादेखील खेळायचा आहे. परदेशी मैदानावर हा भारतीय संघाचा पहिलाच डे-नाईट कसोटी सामना असेल. तत्पूर्वी, भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध भारतामध्ये डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात वनडे सामान्यांनी होईल आणि दौऱ्याचा अखेर 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोघांवर झाला अन्याय तर ‘या’ दोन शिलेदारांना लागली लॉटरी
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारत-ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सामन्याचा घेऊ शकतात प्रत्यक्ष आनंद
ट्रेंडिंग लेख –
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान