कुठल्याही संघाला यश मिळवायचे असेल तर त्या संघाचा कर्णधार चांगला आणि अनुभवी असणे गरजेचे आहे. त्या कर्णधाराला कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेता आले पाहिजे. आयपीएल स्पर्धेत देखील असेच पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत ज्या संघांनी या स्पर्धेत जेतेपद मिळवले आहे, त्या संघाला विजय मिळवून देण्यात संघाच्या कर्णधाराने देखील मोलाची भूमिका बजावली आहे. येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल स्पर्धेचा १५ वा हंगाम सुरू होणार आहे. या स्पर्धेत ७ संघाचे कर्णधार जवळ जवळ निश्चित आहे. परंतु, ३ असे संघ आहेत जे नव्या कर्णधाराच्या शोधात असणार आहेत. चला तर जाणून घेऊया आगामी हंगामातील संघांच्या कर्णधारांबद्दल सर्व काही.
१) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ( रोहित शर्मा)
मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आतापर्यंत ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. आगामी हंगामात देखील तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला १६ कोटी रुपये खर्च रिटेन केले आहे. रिकी पाँटिंगने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माला देण्यात आली होती.
मुंबई इंडियन्स संघाने २०१३,२०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. गतवर्षी मुंबई इंडियन्स संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. आगामी हंगामात हा संघ चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
२) चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) : (एमएस धोनी)
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने गतवर्षी आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. हा संघ आगामी हंगामात देखील चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. यावेळी देखील एमएस धोनी संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने आगामी हंगामासाठी एमएस धोनीला (१२ कोटी), रवींद्र जडेजाला (१६ कोटी), मोईन अलीला (८ कोटी) आणि ऋतुराज गायकवाडला (६ कोटी ) रुपयात रिटेन केले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत ४ वेळेस या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर या संघाने आतापर्यंत एकूण २१३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये १३० सामन्यात या संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ८१ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
३) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight Riders):
शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत २ वेळेस जेतेपद पटकावले आहे. या संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. गतवर्षी या संघाचे नेतृत्व ओएन मॉर्गनने केले होते. परंतु आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने ओएन मॉर्गनला रिलीज केले आहे. त्यामुळे आगामी हंगामात संघाचे नेतृत्व कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१४ नंतर या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु गतवर्षी या संघातील खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले होते. हा संघ आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
४) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) : (संजू सॅमसन) :
राजस्थान रॉयल्स संघ हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिला विजेता संघ आहे. या संघाने २००८ मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. परंतु त्यानंतर या संघाला एकही जेतेपद पटकावता आले नाहीये. गतवर्षी संजू सॅमसनला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु हा संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानी राहिला होता. आगामी हंगामात देखील संजू सॅमसन या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. हा संघ आगामी हंगामात चांगल कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
५) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) : (केन विलियमसन)
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने केन विलियमसन( १४ कोटी) अब्दुल समद (४ कोटी) आणि उमरान मालिकला ( ४ कोटी) रिटेन केले आहे.
या संघात डेविड वॉर्नर, राशिद खान आणि भुवनेश्वर कुमार सारखे अनुभवी खेळाडू होते. तरीदेखील या संघाने त्यांना रिलीज केले आहे. तसेच युवा खेळाडूंना रिटेन केले आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की, हा संघ आगामी हंगामात युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान देऊ शकतो.
६) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(Royal Challengers Bangalore):
गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करत होता. परंतु गतवर्षी त्याने या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आगामी हंगामात हा संघ नव्या कर्णधाराच्या शोधात असणार आहे. आगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी) आणि मोहम्मद सिराज (७ कोटी ) यांना रिटेन केले आहे. या संघाला आतापर्यंत एकही वेळेस जेतेपद मिळवता आले नाहीये. त्यामुळे आगामी हंगामात हा संघ जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरू शकतो.
७) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) : (रिषभ पंत )
दिल्ली कॅपिटल्स संघाने गेल्या २ वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. २०२० मध्ये हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. परंतु या संघाला अंतिम फेरीत विजय मिळवता आला नव्हता. आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी ) आणि एनरिक नोर्खीया (६.५ कोटी) यांना रिटेन केले आहे. आगामी हंगामात हा संघ विजय मिळवण्याच्या दृष्टीने मैदानात उतरू शकतो.
८) पंजाब किंग्ज (Punjab Kings):
पंजाब किंग्ज संघाने आगामी हंगामासाठी केवळ मयांक अगरवाल (१२ कोटी) आणि अर्शदिप सिंग (४ कोटी) यांना रिटेन केले आहे. तर गतवर्षी संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या केएल राहुलने हा संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्ज संघाकडे आगामी मेगा ऑक्शनसाठी ७२ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे पंजाब किंग्ज संघाला चांगला संघ निवडण्याची सुवर्णसंधी आहे.
९) लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow supergiats) : (केएल राहुल)
नव्याने समाविष्ट झालेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाने ३ खेळाडूंना रिटेन केले आहे. ज्यामध्ये केएल राहुल (१७ कोटी), मार्कस स्टोइनिस (९.२ कोटी ) आणि रवी बिश्नोई (४ कोटी ) यांना रिटेन केले आहे. या संघाचे नेतृत्व केएल राहुलच्या हाती देण्यात आले आहे. हा संघ पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
१०) गुजरात टायटन्स (Gujarat titans) : (हार्दिक पंड्या)
गुजरात टायटन्स हा संघ देखील पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धत उतरणार आहे. या संघाने आगामी हंगामासाठी हार्दिक पंड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी) आणि शुबमन गिलला (८ कोटी) रिटेन केले आहे. या संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या कडे सोपवण्यात आले आहे. जो पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत ही जबाबदारी पार पाडताना दिसून येणार आहे. या संघाकडून देखील आगामी हंगामात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
INDvsWI: दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने जिंकला टॉस; केएल राहुलचे पुनरागमन, तर पोलार्ड बाहेर
केएल राहुल इन, ईशान आऊट; तर कुलदीपच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; अशी असू शकते ‘प्लेइंग ११’